India vs England : तिसऱ्या कसोटीमध्ये प्रथम भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी त्यात 9 धावांचं योगदान दिलं आणि इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावे केला आहे. गेल्या काही काळापासून टीकेचा धनी असलेल्या चेतेश्वर पुजाराने अप्रतिम बॅटिंग केली. त्याला कर्णधार कोहलीची चांगली साथ लाभली. याचदरम्यान पुजाराच्या एका शॉटने अंपायर थोडक्यात बचावले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
डावाची 79 वी ओव्हर टाकायला फिरकीपटू मोईन अली बोलिंग मार्कवर आला. त्याने पुजाराला थोडासा शॉर्ट बॉल टाकला. पुजारानेही क्विक अॅक्शन घेत बॅकफूटवर जाऊन लेगसाईटला जोरदार पंच केला. शॉट एवढा कडक होता, की लेगसाईटला उभे असलेले अंपायर थोडक्यात वाचले.
पुजाराने अतिशय ताकदीने शॉट मारला होता. तो वाऱ्याच्या वेगाने अंपायर रिचर्ड केटलब्युरो यांच्याजवळ गेला. पण अंपायर अगोदरच सावध थांबले होते. जसा बॉल त्यांच्याजवळ आला तसे ते मटकन खाली बसले आणि बॉल त्यांच्या डोक्यावरुन गेला. जर ते खाली बसले नसते तर त्यांना इजा होण्याची दाट शक्यता होती.
पाहा व्हिडीओ :
— Sportzhustle_Squad (@sportzhustle) August 27, 2021
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी चांगली केली. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये इंग्लंडचे उर्वरीत फलंदाज बाद करुन इंग्लंडचा डाव 432 धावांवर संपवला. भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा या तिघांनी प्रत्येकी 2 बळी घेत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात बरी झाली नाही.
19 व्या षटकात संघ 34 धावांवर असताना लोकेश राहुल (8) बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा (59) आणि चेतेश्वर पुजाराने 82 धावांची भागीदारी केली. रोहितला रॉबिन्सनने पायचित केलं. त्यानंतर पुजारा आणि विराट कोहली या जोडीने अखेरपर्यंत चिवट फलंदाजी केली. दोघांनी 196 चेंडूत नाबाद 99 धावांची भागीदारी केली आहे. पुजारा 91 धावांवर खेळत आहे. तर विराट 45 धावांवर नाबाद आहे.
हे ही वाचा :