IND vs NZ : राहुल द्रविडच्या कोचिंगबाबत अश्विनचं थेट उत्तर, म्हणाला, ‘इतक्यात भाष्य करता येणार नाही’
राहुल द्रविड भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यश मिळवून त्याचा प्रवास सुरू झाला आहे.
मुंबई : राहुल द्रविड भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यश मिळवून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक बनल्यापासून तो सतत मीडियामध्ये चर्चेत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन म्हणाला की, “आत्ता राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाइलवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल. त्यावर सध्या भाष्य करता येणार नाही.” मात्र, “या दिग्गज खेळाडूच्या मार्गदर्शनामुळे ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल,” असा विश्वास त्याने व्यक्त केला. (India vs New Zealand : its early to comment on Rahul Dravid’s coaching style, says R. Ashwin)
द्रविडची रवी शास्त्रींच्या जागी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सध्याच्या टी-20 मालिकेपासून त्याचा कार्यकाळ सुरू झाला आहे. याआधी तो श्रीलंका दौऱ्यावरही भारताचा प्रशिक्षक होता, मात्र तेव्हा त्याने काळजीवाहू म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
बुधवारी भारताने न्यूझीलंडवर पाच विकेट्सने विजय मिळवला, त्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अश्विन म्हणाला, “राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाईलवर सध्या भाष्य करणे माझ्यासाठी खूप घाईचे आहे, परंतु त्याने अंडर-19 स्तरापासूनच त्याचे कर्तृत्व सिद्ध केलं आहे. तो बऱ्याच गोष्टी नशिबावर सोडत नाही, त्याऐवजी तयारी आणि प्रक्रियेवर त्याचा विश्वास आहे, जेणेकरून आम्ही भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंद परत आणू शकू.” टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात एक नवीन नेतृत्व गट तयार झाला आहे. द्रविडने शास्त्रींची जागा घेतली आहे, तर टी-20 मध्ये विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळत आहे.
अश्विनचे चार वर्षांनी टी-20 संघात पुनरागमन
अश्विनने चार वर्षे संघाबाहेर (मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये) राहिल्यानंतर अलीकडेच भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे. या ऑफस्पिनरला 2017 पासून मर्यादित षटकांचा एकही सामना खेळायला मिळाला नाही. अलीकडेच त्याने संघाच्या इंग्लंड दौऱ्यावरही प्रेक्षकाची भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यावर या 35 वर्षीय खेळाडूने टी-20 विश्वचषकादरम्यान संघात पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठीही तो भारतीय संघाचा भाग आहे आणि बुधवारी पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या.
भारताची विजयी सलामी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. पण सूर्यकुमार बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर दोघेही झटपट बाद झाले. ज्यामुळे अखेरच्या अखेरच्या 3 चेंडूत भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. अशा वेळी आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने चौकार लगावत सामन्यात विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना भारताने जिंकल्याने भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दोन सामन्यानंतर उभय संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
इतर बातम्या
T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया
(India vs New Zealand : its early to comment on Rahul Dravid’s coaching style, says R. Ashwin)