IND vs PAK: बरच नाटय, 2 विकेट, सर्वांचच टेन्शन वाढवणारी ‘ती’ लास्ट ओव्हर कशी होती?
IND vs PAK: मोहम्मद नवाजने या ओव्हरमध्ये एकूण 9 बॉल टाकले. विराट कोहली बोल्ड सुद्धा झाला, पण....
मेलबर्न: टीम इंडियाने आज पाकिस्तानवर मेलबर्नच्या मैदानात थरारक विजय मिळवला. या विजयाचा नायक विराट कोहली आहे, त्याच्यामुळेच टीम इंडिया जिंकली. पण लास्ट ओव्हरमध्ये जे घडलं, ते खूपच रोमांचक होतं. क्रिकेट चाहत्यांना एक वेगळी अनुभूती या सामन्याने दिली. प्रत्येक चेंडूनंतर श्वास रोखले जात होते. अखेरच्या चेंडूपर्यंत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे डोळे टीव्हीकडे लागले होते. सर्वांचच टेन्शन वाढवणारी ही लास्ट ओव्हर होती तरी कशी? जाणून घेऊया.
लास्ट ओव्हरमध्ये काय स्थिती होती?
टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. क्रीजवर हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीची जोडी होती. सर्वांचच लक्ष या दोघांकडे लागलं होतं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज गोलंदाजी करणार होता.
19.1: हार्दिक पंड्या मोहम्मद नवाजच्या चेंडूवर मिडविकेटला मोठा फटका खेळायला गेला. पण आऊट झाला. बाबर आजमकडे त्याने सोपा झेल दिला.
19.2: स्ट्राइकवर आलेल्या दिनेश कार्तिकने 1 रन्स घेतला.
19.3: विराट कोहलीने 2 धावा काढल्या.
19.4: विराटने या बॉलवर सिक्स मारला. पण हा चेंडू अंपायरने नो बॉल दिला. बाबर आजमने यावरुन पंचांशी हुज्जतही घातली. अंपायर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. नवाजने हा चेंडू कमरेच्या वर टाकला होता.
19.4: मोहम्मद नवाजने वाइड चेंडू टाकला. त्यामुळे फ्रि हिट कायम राहिला.
19.4: विराट कोहली फ्रि हिटच्या या चेंडूवर बोल्ड झाला. पण टीम इंडियाने पळून 3 रन्स काढले. पाकिस्तानी टीमने पुन्हा अंपायरशी वाद घातला. हा डेड बॉल द्यावा, अशी त्यांची इच्छा होती. पण भारताला 3 रन्स मिळाल्या.
19.5: भारताला विजयासाठी 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. दिनेश कार्तिक स्ट्राइकवर होता. पण तो स्टम्पआऊट झाला.
19.6: आता भारताला 1 बॉलमध्ये 2 रन्स हव्या होत्या. पण नवाजन वाइड चेंडू टाकला.
19.6: आता भारताला 1 बॉलमध्ये 1 रन्स हवा होता. अश्विनने ही धाव घेऊन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.