IND vs PAK | अमेरिकेत T20 वर्ल्ड कप, ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
IND vs PAK | T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामना असा खेळवला जाणार. आयपीएल संपल्यानंतर T20 वर्ल्ड कप होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजने मिळून या वर्ल्ड कपच आयोजन केलं आहे. अमेरिकेत दिवसा की, रात्री हे सामने खेळवले जाणार? भारताचे सर्व सामने कुठल्या देशात होणार?
IND vs PAK World cup Match | भारत-पाकिस्तान सामन्यावर सगळ्या जगाची नजर असते. क्रिकेट विश्वातील हा सर्वाधिक पाहिला जाणार सामना आहे. प्रत्यक्ष स्टेडियमवर आणि टीव्ही-मोबाइलवर कोट्यवधील लोक या सामन्याचा आनंद लुटतात. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानची टक्कर होणार आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम आमने-सामने येणार आहेत. जून महिन्यात हा वर्ल्ड कप होणार आहे. T20 वर्ल्ड कपच आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज मिळून करणार आहेत. अजून या वर्ल्ड कपला 6 महिने बाकी आहेत. पण या टुर्नामेंटसाठी वातावरण निर्मिती आतापासूनच सुरु झालीय. या टुर्नामेंटमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलीय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तान सामना अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यू यॉर्कमध्ये होणार आहे. हा सामना 8 जून किंवा 9 जूनला होऊ शकतो. तारीख अजून ठरलेली नाही. पण भारत-पाकिस्तान सामना शनिवार किंवा रविवारी पैकी एकादिवशी होईल. भारत-पाकिस्तान सामना डे नाइट नाही, तर सकाळी सुरु होईल. अमेरिकेत हा सामना सकाळी आयोजित करण्यामागे एकमेव उद्देश हा आहे की, भारतात क्रिकेटप्रेमींना हा सामना पाहता येईल. अमेरिकेत सकाळ होते, तेव्हा भारतात रात्र असते. भारत-पाकिस्तान सामन्याचे सर्वाधिक चाहते या दोन देशांमध्ये आहेत. त्यामुळे अमेरिकेत सकाळच्यावेळी हा सामना खेळवला जाईल. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा भारत-पाकिस्तान सामना सकाळी होईल. नेहमीच दोन्ही टीममध्ये डे-नाईट सामना झालाय.
भारताचे सगळे सामने कुठे होणार?
मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सुद्धा म्हटलय की, भारतीय क्रिकेट टीम आपले सर्व सामने अमेरिकेतच खेळेल. अमेरिकेत भारतीय वंशाचे लाखो लोक वास्तव्याला आहेत. तिथे सुद्धा टीम इंडियाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय. लॉस एंजेलिसमध्ये 2028 ऑलिम्पिक होणार आहे. यात क्रिकेटचाही समावेश करण्यात आलाय.