पार्ल: “तो आमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो सहावा गोलंदाज आहे. सहावा गोलंदाज खूप महत्त्वाचा असतो” काल पहिल्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) वेंकटेश अय्यरसाठी (Venkatesh Iyer) ही विधाने केली होती. पण आज पार्लमध्ये सामना सुरु झाला, तेव्हा राहुलचे शब्द आणि कृतीमध्ये फरक दिसून आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa, 1st ODI) आज पहिल्या वनडेमध्ये राहुलने वेंकटेश अय्यरला एक षटकही दिले नाही. ऑलराऊंडर म्हणून वेंकटेश अय्यरला संघात घेतले होते, मग त्याला एक ओव्हरही का दिली नाही? राहुलच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राहुल असा कसा विसरला?
महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचे आज प्रमुख पाच गोलंदाज विकेट काढण्यासाठी संघर्ष करत होते, त्यावेळी राहुलला वेंकटेश अय्यर दिसला नाही. वेंकटेश क्षेत्ररक्षण करत होता, पण राहुलने त्याला गोलंदाजी दिली नाही. केएल राहुलच्या याच रणनितीवर गौतम गंभीरने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “वेंकटेश अय्यर गोलंदाजीसाठी सहावा पर्याय होता. ऑलराऊंडर म्हणून तुम्ही त्याला संघात घेतलं, मग त्याला गोलंदाजी दिली पाहिजे होती” असे गौतम गंभीर कॉमेंट्री करताना म्हणाला.
विजय हजारे करंडक स्पर्धेत वेंकटेश अय्यरने दाखवला जलवा
वेंकटेश अय्यरने विजय हजारे करंडक स्पर्धेत फक्त बॅटनेच नाही, चेंडूनेही करामत दाखवली होती. त्याने या स्पर्धेत नऊ विकेट घेतल्या होत्या. त्याचा इकॉनमी रेट प्रति षटक 6 धावांपेक्षाही कमी होता. राहुल स्वत:च बोलला वेंकटेश गोलंदाज आहे आणि त्यालाच गोलंदाजी दिली नाही. हे चक्रावून टाकणारं आहे. पहिल्या 20 षटकात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी बॉलिंग केली. मलान आणि डिकॉकला मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. त्यांचे दोन विकेटही लवकर गेले होते. पण कॅप्टन टेंबा बावुमा आणि डुसे जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी करुन भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या दोघांच्या शतकाच्या बळावरच दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 296 धावा केल्या.
india vs south africa 1st odi venkatesh iyer didnt get a single over despite 6th bowling option