IND vs SA: आपला पालघरचा शार्दुल ठाकूर टीम इंडियासाठी बनला ‘संकटमोचक’, भन्नाट स्पेलने सर्वांनाच केलं गप्प
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्यादिवशी पालघरचा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) संघासाठी संकटमोचक ठरला आहे.
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्यादिवशी पालघरचा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) संघासाठी संकटमोचक ठरला आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्यादिवशी कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडी जमली होती. दोघेही मोठी धावसंख्या उभारु शकतात, असे वाटत होते. दोघांनी मिळून 200 पेक्षा जास्त चेंडू खेळले होते. त्यावेळी शार्दुल ठाकूर संकटमोचक बनून संघासाठी धावून आला. शार्दुलने लंचच्या आधी अवघ्या पाच षटकात खेळाचा नूरच पालटून टाकला. (India vs South Africa 2 nd test johannesburg Wanderers Stadium Shardul Thakur took important wickets)
लंचआधी तीन महत्त्वाच्या विकेट शार्दुलने लंचआधी दक्षिण आफ्रिकेच्या तीन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्याने सर्वप्रथम एल्गर आणि पीटरसनची जमलेली जोडी फोडली. त्यानंतर त्याने अर्धशतक ठोकणाऱ्या पीटरसनला बाद केले. त्यानंतर त्याने लगेच रासी वॅन डार दुसांलाही आऊट केले. लंचनंतर शार्दुलने आणखी चार विकेट काढल्या. त्याने पहिल्यांदाच एकाडावात 61 धावांमध्ये सात विकेट घेतल्या.
जमलेली जोडी फोडली पीटरसन आणि एल्गरची जोडी जमलेली असताना कर्णधार केएल राहुलने शार्दुलच्या हाती चेंडू सोपवला. त्याने निराश केले नाही. 39 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने एल्गरला विकेटकिपर ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर पीटरसनलाही चकवलं. पीटरसनने शार्दुलच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मयंक अग्रवालकडे झेल दिला. रासी वॅन डार दुसांही शार्दुलच्या आत येणाऱ्या चेंडूवर फसला. हा झेल पंतने पकडला. पण त्यावरुन वाद झाला. रिप्लेमध्ये चेंडू पंतच्या ग्लोव्हजमध्ये जाण्याआधी जमिनीला स्पर्श करताना दिसला.
विश्वास सार्थ ठरवला शार्दुलने आज आपल्या कामगिरीने सर्वांचीच मन जिंकून घेतली. कारण पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात तो विशेष चमक दाखवू शकला नव्हता. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने बॅटने विशेष काही करुन दाखवले नव्हते. शार्दुलची संघात निवड होण्यामागे त्याची अष्टपैलू कामगिरी लक्षात घेतली जाते. गोलंदाजी बरोबर फलंदाजी करण्याचीही शार्दुलची क्षमता आहे. म्हणनूच पहिल्या कसोटीत अनुभवी इशांत शर्माला बेंचवर बसवून त्याची संघात निवड करण्यात आली होती. आज शार्दुलने त्याच्यावरील विश्वास सार्थ करुन दाखवला.
संबंधित बातम्या:
Ind vs SA : रबाडाच्या गोलंदाजीवर बुमराहचा शानदार षटकार, पत्नी संजनाची रिअॅक्शन व्हायरल ‘अजिंक्य सारखेच विराटचे आकडे, मग टीममधील त्याच्या स्थानाबद्दल कोणीच का बोलत नाही’ IND vs SA: अरे, बुमराहला मध्येच काय झालं? अश्विन समोर असतानाच… पाहा VIDEO
(India vs South Africa 2 nd test johannesburg Wanderers Stadium Shardul Thakur took important wickets)