जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात भारताने 266 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य़ दिले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने पुजारासोबत मिळून 111 धावांची भागीदारी केली. या कामगिरीनंतरही रहाणेला संघाबाहेर काढण्याची मागणी होत आहे.
अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे. "अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे" असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले.
"विराट कोहली संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला संघाबाहेर करु नये. त्याने कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात विहारीने 40 धावा केल्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली पाहिजे" असे गौतम गंभीर यांचे मत आहे.
अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावाआधी खूप खराब खेळ केला आहे. त्याची सरासरी 20 पेक्षाही कमी आहे. क्रिकेट तज्ज्ञांनी नेहमीच रहाणेच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंना संधी देण्याचं मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी जिंकली, तर रहाणेला आणखी एक संधी मिळू शकते.
रहाणेशिवाय चेतेश्वर पुजाराबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण गौतम गंभीरच्या मते तिसऱ्या क्रमांकावर पुजाराची कामगिरी चांगली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे, असं गंभीर म्हणाला.