Ind vs Sa 3rd T 20: आणखी एक चूक नाही परवडणार, टीम इंडियाचा खेळच संपेल, पंत दोघांपैकी कोणाला बाहेर बसवणार?
दिल्लीमध्ये (Delhi) हरले, कटकमध्ये मॅच गमावली. आता विशाखापट्टनममध्ये काय होणार? टीम इंडियासमोर हाच मोठा प्रश्न आहे. ज्याचं उत्तर त्यांना खेळातूनच द्यावं लागेल.
मुंबई: दिल्लीमध्ये (Delhi) हरले, कटकमध्ये मॅच गमावली. आता विशाखापट्टनममध्ये काय होणार? टीम इंडियासमोर हाच मोठा प्रश्न आहे. ज्याचं उत्तर त्यांना खेळातूनच द्यावं लागेल. पहिले दोन सामने हरल्यानंतर टीम इंडियासमोर (Team India) सीरीज गमावण्याचा धोका निर्माण झालाय. फलंदाज फॉर्ममध्ये नाहीयत आणि गोलंदाजांनाही धावा रोखणं जमत नाहीय. दक्षिण आफ्रिका आता सीरीज जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारत टी 20 चे सलग 12 सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) सीरीज खेळण्यासाठी उतरला होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर पहिल्या दोन मॅचमध्ये काही चाललं नाही. पहिला सामना भारताने खराब गोलंदाजीमुळे गमावला, तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी निराश केलं.
पंत-ऋतुराजच्या बॅटमधून धावा आटल्या
भारताचे सलामीवीर पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरले आहेत. इशान किशनने आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलं आहे. पण ऋतुराजने 23 आणि एक रन्स अशी त्याची धावसंख्या आहे. वेगवान गोलंदाजी खेळताना ऋतुराजच्या टेक्निकबद्दलही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रेयस अय्यरने चांगली सुरुवात केली. पण त्याला वेगाने धावा बनवता आल्या नाहीत. हार्दिक पंड्याने पहिल्या सामन्यात चांगले फटके खेळले होते. पण कटकमध्ये त्यालाही काही करता आलं नाही. गोलंदाजीतही त्याला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. केएल राहुलच्या दुखापतीमुळे कॅप्टनशिपची संधी मिळालेल्या पंतला आतापर्यंत 29 आणि फक्त 5 धावा करता आल्या आहेत.
पंतच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह
ऋषभ पंतच्या कॅप्टनशिपवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. दुसऱ्यासामन्यात अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्या आधी फलंदाजीला पाठवायचा निर्णयही चुकीचा ठरला. कॅप्टन आणि खेळाडू म्हणून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलच्या फिरकीने आतापर्यंत निराश केलं आहे. डेविड मिलर, रासी वान डर डुसे आणि हेनरिक क्लासेन सारख्या फलंदाजांनी त्यांच्याविरोधात सहज धावा केल्या आहेत. तिसऱ्या सामन्यात या दोघांपैकी एकाला बाहेर बसवलं जाऊ शकतं. टीम मॅनेजमेंट युवा लेगस्पिन्र रवी बिश्नोई किंवा ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरला संधी देऊ शकते. वेंकटेश आयपीएलमध्ये ओपनिंग करतो.