IND vs SA: भारत हरला, 29 वर्षानंतरही मालिका विजयाचं स्वप्न अपूर्ण, दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त खेळ
दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहेत. पण त्या खेळपट्टीवर भारताच्या वर्ल्डक्लास गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेने कशी फलंदाजी केली ?
केपटाऊन: मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. पहिली सेंच्युरियन कसोटी (Centurion test) जिंकल्यामुळे 29 वर्षानंतर मालिका विजयाचे स्वप्न साकार होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण जोहान्सबर्ग पाठोपाठ केपटाऊन कसोटीतही (Cape town test) दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसनने शानदार 82 धावांची खेळी केली. डुसे-बावुमा जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आज दिवसभरात भारतीय गोलंदाजांना फक्त एक विकेट मिळवता आला.
पराभवाचं मुख्य कारण आहे ते…. दुसऱ्या विकेटसाठी एल्गर आणि पीटरसनमध्ये झालेली 77 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. याच भागीदारीने विजयाचा पाया रचला. आज भारतीय गोलंदाज काही चमत्कार घडवतील असं वाटलं होतं. पणी ती अपेक्षा फोल ठरली. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावाप्रमाणे इथेही दक्षिण आफ्रिकेने सहज लक्ष्य गाठलं. सलग दुसऱ्या कसोटीत भारताच्या पराभवाच मुख्य कारण आहे ती, फलंदाजी.
फ्लॉप फलंदाजी या मालिकेला सुरुवात झाल्यापासून एखाद-दुसऱ्या खेळाडूचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली आणि दुसऱ्याडावात ऋषभ पंतने दमदार फलंदाजी दाखवली. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर निदान 212 धावांचे लक्ष्य ठेवता आले.
मग भारतीय फलंदाज तसा का खेळ दाखवू शकले नाहीत? दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहेत. पण त्या खेळपट्टीवर भारताच्या वर्ल्डक्लास गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेने कशी फलंदाजी केली ? मग भारतीय फलंदाज तसा का खेळ दाखवू शकले नाहीत? असा प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरतात हे पुन्हा एकदा दिसून आलं. जोहान्सबर्गमध्येही असचं झालं होतं. पहिल्या डावात 223 इतकी कमी धावसंख्या असूनही भारतीय गोलंदाजांनी आपल्या धारदार गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला घायाळ केलं व 13 धावांची आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात तशी कामगिरी करणे गोलंदाजांना जमलं नाही.