IND vs SA : भारताच्या स्वप्नांवर पावसाचं सावट, जाणून घ्या सेंच्युरियनमध्ये कसं असेल हवामान?

| Updated on: Dec 30, 2021 | 10:51 AM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. या सामन्यात भारत विजयाच्या जवळ आहे.

IND vs SA : भारताच्या स्वप्नांवर पावसाचं सावट, जाणून घ्या सेंच्युरियनमध्ये कसं असेल हवामान?
SuperSport Park Cricket Stadium (Centurion Park)
Follow us on

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. या सामन्यात भारत विजयाच्या जवळ आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते पण यजमानांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अवघ्या 94 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. आता त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज आहे तर भारताला फक्त सहा विकेट्सची गरज आहे. मात्र, यादरम्यान सर्वांच्या नजरा सेंच्युरियनमधल्या हवामानाकडे असतील. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला होता. तेव्हापासून सर्वांचे लक्ष हवामानाकडे लागले आहे. सेंच्युरियनमध्ये ढगाळ वातावरण आहे. पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही तर हा सामना भारत जिंकू शकतो. (India vs south africa centurion weather report, rain may play spoil 5th day of first test match)

पाचव्या दिवसातील (30 डिसेंबर) सेंच्युरियनच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, भारतासाठी कोणतीही चांगली बातमी नाही. AccuWeather च्या रिपोर्टनुसार, आज म्हणजेच 30 डिसेंबरला दोन तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. यासोबतच वादळी वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात ढगाळ वातावरणही राहील.

एल्गर भारताच्या अडचणी वाढवू शकतो

पाऊस भारताच्या आशा-आकांक्षा खराब करू शकतो आणि याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरही भारताला अडचणीत आणू शकतो. त्यांचा कर्णधार सध्या 52 धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आशा फक्त त्यांचा कर्णधार आणि पावसाकडून आहेत. तो या सामन्यात संघाला पराभवापासून वाचवू शकतो. भारताला सहा विकेट्सची गरज असून टीम इंडिया पहिल्या सत्रातच या सर्व सहा विकेट्स घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारताने या मैदानावर आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही आणि यावेळी भारतीय संघ अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर हा टीम इंडियाचा येथील पहिला विजय असेल.

चौथ्या दिवस गोलंदाजांचा

काल सामन्याच्या चौथ्यादिवशी भारताचा डाव 174 धावात आटोपला. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य दिले आहे. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 94 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही 211 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार डीन एल्गर अजूनही मैदानावर आहे आणि तीच भारतासाठी मुख्य अडचण आहे. त्याने दिवसाच्या अखेरच्या सत्रात शानदार अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेने मार्करम, कीगन पीटरसन आणि सारी वॅन डर यांच्या विकेट गमावल्या आहेत. दिवसातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने केशव महाराजला बाद करुन भारताला मोठा दिलासा दिला.

दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या असून शामी आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. उद्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला तर सेंच्युरियनवरील तो भारताचा पहिला विजय ठरेल. याआधी भारताने दोन्ही सामने गमावले आहेत. सेंच्युरियनच्या या पीचवर 305 धावांचे लक्ष्य इतके सोपे नाहीय. आतापर्यंतचा सेंच्युरियनचा इतिहास पाहिला तर कुठलाही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. सेंच्युरियनच्या या विकेटवर गोलंदाज धाक ठेवतील अशी स्थिती आहे. कारण चेंडूला मध्येच उसळी मिळतेय, तर कधी चेंडू खाली राहतोय.

दुसऱ्यात डावात भारतीय फलंदाजांनी केली निराशा

पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कागिसो राबाडा, लुंगी निगीडी आणि मार्को जॅनसेन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव 174 धावात आटोपला. पहिल्या डावातील 130 धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकला नाही.

चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतीली फलंदाजांनी निराश केले. भारताकडून कुणीही अर्धशतकी खेळी केली नाही. ऋषभ पंतने सर्वाधिक (34) धावा केल्या. मागच्या डावातील शतकवीर केएल राहुल आज (23) धावांवर बाद झाला. विराट कोहली (18), चेतेश्वर पुजारा (16) आणि अजिंक्य रहाणे (20) धावांवर बाद झाले. राबाडा, जॅनसेनने प्रत्येकी चार तर निगीडीने दोन विकेट घेतल्या.

इतर बातम्या

Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, पृथ्वी शॉ कर्णधार

Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….