भारत केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. सध्या कसोटी मालिका 1-1 बरोबरीत आहे. त्यामुळे केपटाऊनमध्ये मालिकेचा निकाल लागेल. या सामन्यात भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चालण खूप आवश्यक आहे. न्यूलँडसचं हे मैदान बुमराहसाठी सुद्धा खास आहे. चार वर्षापूर्वी बुमराहच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात याच मैदानावर झाली आहे. आता बुमराह पुन्हा तिथे आला आहे.
11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या केपटाऊन कसोटीआधी बुमराहने आपल्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला व भावूक संदेशही दिला. "केपटाऊन जानेवारी 2018 मध्ये माझ्या कसोटी करीअरला सुरुवात झाली होती. चार वर्षानंतर एक खेळाडू, व्यक्ती म्हणून मी पुढे गेलोय. या मैदानावर आल्यानंतर पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या आहेत"
2016 मध्ये टी 20 आणि वनडे संघात स्थान मिळवणाऱ्या बुमराहने पाच जानेवारी 2018 रोजी केपटाऊन कसोटीत डेब्यु केला. त्याने एबी डिविललियर्स सारख्या दिग्ग्जाचा विकेट काढला होता. त्याने या सामन्यात एकूण चार विकेट काढले होते.
बुमराहने या कसोटी सामन्यानंतर मागे वळून बघितलं नाही. त्याने 26 कसोटी सामन्यात 107 विकेट काढल्या आहेत. चार वर्षांपूर्वी केपटाऊन मध्ये मालिकेतला पहिला कसोटी सामना खेळला होता. यावेळी तिथे शेवटचा सामना आहे. चारवर्षापूर्वीचा बुमराह आणि आताचा बुमराह यात खूप फरक आहे. सध्याचा बुमराह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देऊ शकतो.