IND vs SA: रोहित शर्माशिवाय टीम इंडियाचं जिंकणं मुश्किल का? ते आकड्यांवरुन समजून घ्या….
IND vs SA: पहिल्या T 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट राखून पराभव केला. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 1-0 ने आघाडीवर आहे.
मुंबई: पहिल्या T 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट राखून पराभव केला. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 1-0 ने आघाडीवर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. पण पंतला कॅप्टन म्हणून पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला 212 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेने पाच चेंडू बाकी असताना, हे लक्ष्य पार केलं. रोहितच्या अनुपस्थितीत भारताला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ यावर्षी 2022 मध्ये रोहितच्या अनुपस्थितीत एकही सामना जिंकू शकलेला नाही.
भारत यावर्षी 17 सामने खेळला
भारत यावर्षात एकूण 17 सामने खेळला. रोहितने 11 मॅचमध्ये कॅप्टनशिप केली. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. विराट कोहली, राहुल आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली 6 सामने खेळले गेले. सर्व सामन्यात भारताचा पराभव झाला. रोहित शर्माने यावर्षी 3 वनडे, 6 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं. यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 मध्ये 3-0 ने विजय मिळवला. त्यानंतर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी 20 आणि दोन कसोटी सामन्यात क्लीन स्वीप विजय मिळवला.
कोहली, राहुल आणि पंत फ्लॉप शो
विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पराभव झाला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारत एक कसोटी आणि 3 वनडे सामन्यात पराभव झाला. कोहली आणि राहुलच्या अपयशानंतर ऋषभ पंतकडे दिल्लीत अपयशाचा हा सिलसिला मोडण्याची संधी होती. पण त्यालाही ती संधी साधता आली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात ईशान किशनने सर्वाधिक 76 धावा केल्या. कॅप्टन पंतने 29 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वॅन डार डुसेने नाबाद 75 आणि डेविड मिलरने नाबाद 64 धावा फटकावल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची विजयी भागीदारी केली.