IND vs PAK, WWC 2022: स्नेह राणा-पूजा वस्त्राकरची जबरदस्त फलंदाजी, भारताने पाकिस्तानला दिलं 245 धावांचं लक्ष्य
IND vs PAK, WWC 2022: ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत आजपासून भारताच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तान विरोधात (India vs Pakistan) सुरु आहे. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
IND vs PAK, WWC 2022: ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत आजपासून भारताच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तान विरोधात (India vs Pakistan) सुरु आहे. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात सात बाद 244 धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं आहे. पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांची आणि पूजाने 59 चेंडूत 67 धावांची तडाखेबंद खेळी केली. दोघींनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यांनीच भारताला अडचणचीतून बाहेर काढलं. 114 धावांवर सहा विकेट अशी स्थिती असताना दोघींची जोडी जमली. या दोघींच्याआधी सांगलीच्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) कमालीचा खेळ दाखवत डाव सावरला. स्मृतीने 52 धावांची खेळी केली.
200 पर्यंत तरी पोहोचेल? अशी मनात शंका निर्माण झाली होती
भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक (67), स्नेह राणा (53), स्मृती मानधना (52) आणि दीप्ती शर्माने (40) धावांची खेळी केली. या चौघींच्या दमदार फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाला पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पूजा आणि स्नेहने एक अवघड परिस्थितीत संघाचा डाव सावरला. एकवेळ भारताचा डाव 200 पर्यंत तरी पोहोचेल? अशी मनात शंका निर्माण झाली होती. पण पूजा आणि स्नेहने संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. दोघींनी पाकिस्तानच्या महिला गोलंदाजावर हल्लाबोल करत खोऱ्याने धावा वसूल केल्या. स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांच्या खेळीत चार चौकार लगावले. पूजाने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले. या दोघींच्या झंझावती फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
मिताली राज अपयशी
पाकिस्तानकडून निदा दार आणि नाशरा संधूने प्रत्येकी दोन तर फातिमा साना, डायना बेग आणि अनाम अमिनने प्रत्येकी एक विकेट घेतला. भारताकडून आज कॅप्टन मिताली राज आणि हरमनप्रीत कौर अपयशी ठरल्या. दोघींना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मितालीला (9) धावांवर नाशरा संधूने डायना बेगकरवी झेलबाद केलं, तर हरमनप्रीतला (5) धावांवर निदा दारने पायचीत पकडलं.