विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक
सध्या भारताकडे अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. भारताने एकाचवेळी इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर संघ पाठवल्याने हे स्पष्ट होते. दरम्यान इतके खेळाडू असल्याने अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वांमध्ये कमालीची चुरस आहे.
कोलंबो : श्रीलंका संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने 38 धावांनी उत्कृष्ट विजय मिळवला. या विजयाचे हिरो ठरले सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar). सूर्याने पुन्हा एकदा अप्रतिम अर्धशतक झळकावत भारताला एक चांगली धावसंख्या करुन दिली तर भुवीने चार विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. दरम्यान श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादवचं आतापर्यंतचं प्रदर्शन अप्रतिम आहे. एकदिवसीय मालिकेपासून तो धावांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे त्याला थेट विराट आणि रोहितच्या पंगतीत बसवत तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लिट पॅकेज’ अशी उपमा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत 50 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 शानदार षटकारांचा समावेश होता. यावेळी सूर्याचा स्ट्राइक रेट तब्बल 147.06 होता. सूर्याने आतापर्यंत भारतासाठी चार टी-20 सामन्यात 46.33 च्या सरासरीने 139 रन्स केले आहेत.
‘प्रत्येक संघात सूर्याला स्थान मिळावं’
एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला ”मी बऱ्याच वेळापासून सूर्याला खेळताना पाहत आहे. मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना सूर्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून मी त्याला पाहतोय आता तो विराट, रोहितसारखी उत्कृष्ट फलंदाजी करु लागला आहे. तो वेगवान गोलंदासह फिरकीपटूंना अप्रतिम फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात सामिल केलं पाहिजे.”
कर्णधार धवननेही केलं कौतुक
सूर्यकुमार यादव मधल्या फळीतील एक दमदार फलंदाज म्हणून समोर येत आहे. त्याने असेच प्रदर्शन कायम ठेवल्यास टी-20 विश्वचषकातही त्याची जागा निश्चित होईल हे नक्की! सूर्यकुमारबद्दल बोलताना कर्णधार धवन म्हणाला, ”सूर्या एक उत्तम खेळाडू आहे. आम्हाला त्याची फलंदाजी पाहताना मजा येते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्येही त्याने चांगली फलंदाजी करत माझ्यावरील दबाही कमी केला.”
इतर बातम्या
सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात
(Indian Batter Suryakuma Yadav is complete package of all three formats says Harbhjan singh)