टीम इंडियाचं शेड्यूल बघून बेन स्टोक्सने क्रिकेटचं सोडलं असतं, जाणून घ्या कधी, कोणा विरुद्ध सामना
आयपीएल (IPL) संपल्यापासून टीम इंडियाचे सातत्याने दौरे, मालिका सुरु आहेत. वर्क लोड मॅनेजमेंट अंतर्गत काही खेळाडूंना विश्रांती दिली जाते, काही युवा खेळाडूंना संधी मिळते.
मुंबई: आयपीएल (IPL) संपल्यापासून टीम इंडियाचे सातत्याने दौरे, मालिका सुरु आहेत. वर्क लोड मॅनेजमेंट अंतर्गत काही खेळाडूंना विश्रांती दिली जाते, काही युवा खेळाडूंना संधी मिळते. भारतीय संघ प्रमाणापेक्षा जास्त क्रिकेट खेळतोय, म्हणून एकाबाजूने टीका होतेय, तर दुसऱ्याबाजूने बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचं शेड्यूल भरपूर व्यस्त ठेवलं आहे. टीम इंडियाच्या नव्या कार्यक्रमानुसार, भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप आधी पाच मालिक खेळणार आहे. नव्या शेड्यूलनुसार भारतीय संघाला झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुद्धा खेळायचं आहे. 22 जुलैपासून भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरीज खेळणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि झिम्बाब्वे मध्ये मालिका सुरु होईल. वनडे सीरीज 22 ऑगस्टपर्यंत चालेलं. 27 ऑगस्टपासून आशिया कप सुरु होईल. यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येतील. ही स्पर्धा आता श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमिराती मध्ये होणार आहे.
दोन देशांविरुद्ध मालिका
आशिया कप नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळेल. या सीरीजची सुरुवात 20 सप्टेंबरला होईल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफिकेत वनडे सीरीज सुरु होईल. 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत ही सीरीज चालेल.
टीम इंडियाची बी टीम खेळेल
महत्त्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज मध्ये टीम इंडियाची बी टीम खेळेल. सीनियर संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप साठी रवाना झालेला असेल. टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून होणार आहे.
बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याचा इरादा
भारतीय क्रिकेट संघ टी 20 वर्ल्ड कप आधी इतकं क्रिकेट खेळणार आहे. तुम्ही विचार करा, बेन स्टोक्स भारतीय संघाचा भाग असता, तर त्याने काय केलं असतं? टीम इंडियाचं हे शेड्युल अनेक भल्या-भल्या खेळाडूंची चिंता वाढवू शकतं. टीम इंडियासाठी एक चांगली बाब म्हणजे त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू तयार आहेत. इतक्या व्यस्त वेळापत्रकामागे बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याचाही एक इरादा आहे.