चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन भारत सरकारचा पाकिस्तानला अल्टिमेटम, ICC ला ही…
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीवर जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने पाकिस्तानला एका ओळीचा अल्टिमेटम दिला आहे. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याबाबत आयसीसी आजच निर्णय घेणार आहे. त्याआधी सरकारने हा अल्टिमेटम दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाबाबत आज बैठक घेणार आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा पाकिस्तानात आयोजित केली जात आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला स्पष्ट सांगितले आहे की, भारतीय संघ कोणत्याही परस्थितीत पाकिस्तानला जाणार नाही. पाकिस्तान संपूर्ण आयोजन करण्यावर ठाम आहे.
आयसीसी बोर्डाची आज बैठक होणार आहे. त्यामुळे यावर आज निर्णय होऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात भारतीय संघाचे सामने दुसऱ्या देशात खेळवले जाऊ शकतील का अशी चाचपणी सुरु आहे. पण त्याआधीच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका ओळीत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक निवेदन जारी केले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये सुरक्षेशी संबंधित समस्या आहेत, त्यामुळे संघ पाकिस्तानात जाणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
आयसीसीला मात्र माहित आहे की, भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर या सीरीजची रंगत कमी होऊन जाईल. पाकिस्तानला देखील तशी समजूत घातली जात आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. या प्रकरणावर एका सूत्राने माहिती दिली की, ‘हायब्रीड’ मॉडेलचा विचार केला जाऊ शकतो. सर्वांचा विचार करून आयसीसी निर्णय घेईल. भारत आणि पाकिस्तानशिवाय स्पर्धेचे आयोजन अशक्य असल्याचं देखील बोललं जात आहे. आयसीसी आणि ब्रॉडकास्टर यांच्यातील करारानुसार, स्पर्धेचे वेळापत्रक किमान 90 दिवस अगोदर जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु तसे होऊ शकलेले नाही.
भारत आणि पाकिस्तानला वेगळ्या गटात ठेवलं जाईल का ही शक्यता ही नाकारली जात आहे. स्पर्धेची लोकप्रियता आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची मागणी होईल. जितके सामने दोघांमध्ये होतील तितकी या स्पर्धेला प्रसिद्धी मिळेल आणि आर्थिक फायदा ही होईल. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही. सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआय देखील संघाला तेथे पाठवणार नाही.
भारतात पाकिस्तानला तीव्र विरोध होतो. त्यामुळे राजकीय परिस्थिती देखील लक्षात घेतली जाते. पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. कारण माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक त्यांच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरले होते. ज्यामध्ये मोठा हिंसाचार देखील झाला आणि काही सुरक्षा रक्षक देखील मारले गेले. पण हिंसाचारानंतर पक्षाने आंदोलन मागे घेतले आहे.
आता अशा तणावाच्या स्थितीत पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणं किती जोखमीचे आहे. पण पाकिस्तान सरकार आणि पीसीबी खेळाडूंच्या सुरक्षेची हमी देत आहे. असं असलं तरी भारताचे सामने यूएईमध्ये होऊ शकतात. पण जर यावर पीसीबीने बहिष्कार टाकला तर आयसीसी तटस्थ ठिकाणी आयोजन करण्याचा निर्णय घेऊ शकते.
#WATCH | Delhi: On Indian cricket team participating in Pakistan, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “… The BCCI has issued a statement… They have said that there are security concerns there and therefore it is unlikely that the team will be going there…” pic.twitter.com/qRJPYPejZd
— ANI (@ANI) November 29, 2024
येत्या काही वर्षांत भारतात देखील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होणार आहे. पाकिस्तानने जर आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकला तर त्याला भारतात होणाऱ्या पुढच्या स्पर्धांनाही मुकेल. ज्याचा मोठा फटका पीसीबी आणि संघाला बसेल. पुढे भारतात आशिया चषक (2025), महिला विश्वचषक (2025) होणार आहे. भारत श्रीलंकेसोबत संयुक्तपणे T20 विश्वचषकाचे (2026) यजमानपद देखील भूषवणार आहे.