Team india : भारताची टीम दक्षिण आफ्रिकेत जाणं धोक्याचं, भारताचा दौरा रिशेड्यूल होण्याची शक्यता
लवकरच भारतीय टीमची दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवडप्रक्रिया पार पडणार होती, मात्र कोरोनाचा नव्या विषाणुने घातलेल्या थैमानामुळे भारतीय संघाची निवड तुर्तास राखून ठेवण्यात आली आहे. बीसीसीआय या दौऱ्याबाबत सरकारच्या परवानगीची वाट बघत आहे
मुंबई : भारतीय टीमचा दक्षिण अफ्रिकेचा दौरा पुन्हा कोरोनाच्या सावटाखाली सापडला आहे. भारतीय टीमचं दक्षिण अफ्रिकेत जाणं सध्या धोक्याचं होऊन बसलं आहे. ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा जगाला जसा फटका बसत आहे, तसाच फटका क्रिकेट विश्वालाही बसत आहे. डिसेंबरमध्ये भारतीय टीम 3 कसोटी, 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी-20 सामने खेळण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत जाणार होती, मात्र कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे भारतीय खेळाडुंच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
संघाची निवड राखून ठेवली
लवकरच भारतीय टीमची दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवडप्रक्रिया पार पडणार होती, मात्र कोरोनाचा नव्या विषाणुने घातलेल्या थैमानामुळे भारतीय संघाची निवड तुर्तास राखून ठेवण्यात आली आहे. बीसीसीआय या दौऱ्याबाबत सरकारच्या परवानगीची वाट बघत आहे, सरकार काय निर्णय घेईल हे पाहूनच भारतीय टीमच्या दौऱ्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे अजून तरी या दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम आहे. 9 डिसेंबरला टीम इंडिया या दौऱ्यासाठी रवाना होणार होती. खेळाडुंना चार्टड प्लेनने या दौऱ्यासाठी पाठवण्याची शक्याता आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरला नियोजित आहे. हे वेळापत्रक तसचं राहणार की यात काही बदल होणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कानपूर टेस्टनंतर टीम निवडीबाबत नियोजन होतं
कानपूरच्या कसोटी सामन्यानंतर टीमची निवड होणार होती. त्यात ज्या खेळाडुंना आराम दिला आहे, त्यांना काही दिवस क्वारंटाईन व्हायचं होतं. रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहमद्द शामी, के. एल. राहुल, शार्दुल ठाकूरसारखे काही खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. या खेळाडुंना अजून बीसीसीआयकडून क्वारंटाईन होण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. 3 डिसेंबरला या खेळाडुंना क्वारंटाईन करण्याचं नियोजन होतं. त्यामुळे भारतीय टीमचा हा दौरा कसा असणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.