Asia Cup: नशीब, ‘त्या’ दोन चेंडूंमुळे टीम इंडियाने मलेशियावर मिळवला विजय
ते दोन चेंडू टाकल्यामुळे टीम इंडियाला मलेशियावर आशिया कप स्पर्धेत विजय मिळवता आला.
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमच आशिया कप 2022 स्पर्धेत शानदार प्रदर्शन कायम आहे. महिला टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या सामन्यात मलेशियाला हरवलं. भारतीय टीमने सोमवारी डकवर्थ लुइस नियमातंर्गत मलेशियन टीमला 30 धावांनी हरवलं. टीम इंडियाने प्रथम बॅटिंग करताना चार विकेट गमावून 181 धावा केल्या होत्या.
सामना पुढे होऊ शकला नाही
प्रत्युत्तरात मलेशियन टीमने दोन विकेट गमावून 16 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पाऊस आला. त्यामुळे सामना पुढे होऊ शकला नाही. अंपायर्सनी डकवर्थ लुइस नियमाच्याआधारे टीम इंडियाला विजयी घोषित केलं. याआधी टीम इंडियाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी हा चांगला सामना होता.
टॉप 3 प्लेयर्सनी उत्तम धावा केल्या. त्यामुळे टीमने चांगला स्कोर केला. टी 20 क्रिकेटमध्ये डकवर्थ लुइस नियमाचा वापर करण्यासाठी कमीत कमी पाच ओव्हर्सचा खेळ आवश्यक आहे. टीम इंडिया गोलंदाजी करताना पाच ओव्हर्सपेक्षा जास्त खेळ झाला होता. त्यामुळे डकवर्थ लुइसचा नियम लागू झाला. पाच ओव्हर्सचा खेळ होण्याआधी पावसामुळे सामना रद्द झाला असता, तर विजय मिळवता आला नसता. टीम इंडियाने 5.2 ओव्हर्स गोलंदाजी केली होती.
मलेशियाची खराब सुरुवात
182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर दिप्ती शर्माने कॅप्टन विनफील्ड डुरासिंगमला शुन्यावर बाद केलं. वान जुलियाला राजेश्वरी गायकवाडने एक रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मास एलिसा 14 आणि एल्सा हंटरने एक रन्स बनवला होता. त्याचवेळी पावसामुळे सामना सुरु होऊ शकला नाही.