ICC Women ODI Rankings: मिताली राजची रँकिंग घसरली, गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र मोठा फायदा
भारतीय महिला क्रिकेटपटू सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या लीगमध्ये अखेरचा सामना जिंकत भारतीय महिलांनी व्हाईट वॉश मिळण्यापासून संघाला वाचवलं.
मुंबई: महिला क्रिकेटपटूंची जागतिक रँकिग (ICC Women ODI ranking) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय महिला संघासाठी (Indian Women Cricket Team) एक चांगली आण एक वाईट बातमी आहे. यामध्ये वाईट बातमी म्हटलं तर कर्णधार मिताली राज (Mithali Raj) ही मागील बराच काळापासून अव्वल स्थानावर विराजमान होती. पण तिला आता तिसऱ्या स्थानावर घसरावे लागले आहे. तर चांगली बातमी म्हणजे भारताची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीने (Jhulan Goswami) थेट दुसरे स्थानावर झेप घेतली आहे. याआधी ती चौथ्या स्थानावर होती.
नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली. भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने गमावली खरी पण सर्वच भारतीय महिलांनी उत्तम खेळीचे दर्शन यावेळी घडवलें. पहिला सामना 9 विकेट्सने गमावल्यावर दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिलांना 5 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. पण अखेरच्या सामन्यात 2 विकेट्सने भारताने विजय मिळवला. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियन संघाचा सलग 26 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विजयी रथही भारताने थांबवला.
फलंदाजी रँकिग
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यात कर्णधार मितालीने 29 च्या सरासरीने 87 धावा केल्या. त्यामुळे तिची रँकिग घसरली. ज्यामुळे दक्षिण आफ्रीकेची लीजेल ली 761 गुणांसह टॉपवर पोहोचली. तर भारताविरुद्ध तीन सामन्यात 112 धावा करणारी एलिसा हीली 750 गुणांसह दुसरे स्थानावर आहे. तर भारताची बॅटर स्मृति मांधना एक स्थानाच्या फायद्याने सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. तिच्याकडे 710 अंक आहेत.
गोलंदाजी रँकिग
भारताची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीने तिन्ही सामन्यात कमालीची गोलंदाजी केली. तिने तीन सामन्यात चार महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्यात सर्वात भारी कामगिरी तिने अखेरच्या सामन्यात केली. 37 धावांच्या बदल्यात तिने तीन विकेट्स मिळवले. ज्यानंतर तिच्या खात्यात 727 गुण जमा झाले आणि ती दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली. तिच्यापुढे ऑस्ट्रेलियाची जेस योनासेन 760 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचीच मेगन शुट 717 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
— ICC (@ICC) September 28, 2021
हे ही वाचा
(Indias Women Cricketer Jhulan Goswami came on second position at ICC women ranking)