पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका, सचिनने भावनिक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना, म्हणाला…
जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव असणारा पाकिस्तानचा इंझमाम-उल-हक याला श्वसनाचा त्रास होत होता. त्यात त्याला हृदयविकारामुळे लाहोरच्या एका खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करावी लागली.
इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला श्वसनाचा त्रास आणि हृदयविकारामुळे लाहोरच्या एका खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करावी लागली. दरम्यान काही चाचण्यांनंतर असे आढळले की, त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. या बातमीने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी लाडक्या इंझमामसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. यामध्ये भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने देखील ट्विट करत इंझमाम लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली.
सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘इंझमाम तुला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा. तू कायम एक उत्तम प्रतिस्पर्धी राहिला आहे. तू मैदानावरील एक लढवय्या आहेस. तू यातूनही अजून ताकदवर होऊन बाहेर येशील. लवकर बरा हो!’
Wishing you a speedy recovery @Inzamam08. You’ve always been calm yet competitive, and a fighter on the field.
I hope and pray that you’ll come out stronger from this situation as well. Get well soon.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 28, 2021
अँजिओप्लास्टीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
इंझमामची अँजिओप्लास्टी पाकिस्तानचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ प्रोफेसर अब्बास काझिम यांनी केली. इंझमामचा एक नातेवाईक म्हणाला, ‘इंझमाम आता बरा आहे. त्याला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. इंझमाम नोव्हेंबर 1991 ते ऑक्टोबर 2007 या आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 120 कसोटी, 378 एकदिवसीय आणि एक टी -20 सामना खेळला आहे. पाकिस्तानसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानसाठी त्याच्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने (524) खेळले आहेत.
51 वर्षीय इंझमाम 2016 ते 2019 या कालावधीत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचा प्रमुख होता. त्याच्या कार्यकाळातच पाकिस्तानने 2017 मध्ये भारताला हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. म्हणजेच त्याच्याच काळात पाकिस्तानने एखाद्या मोठ्या आयसीसी स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा पराभव केला होता.
2019 च्या विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नवीन व्यवस्थापनाने त्याला पद सोडण्यास सांगितले होते. 2016 च्या टी -20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान तो अफगाणिस्तानचा प्रशिक्षकही होता.
पाकिस्तानचा सर्वकालीन महान खेळाडू
अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी इंझमाम-उल-हकबद्दल ट्विट केले आहे आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. इंझमाम-उल-हक यांची गणना पाकिस्तानच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये केली जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंझमामच्या नावावर आहे.
इंझमाम-उल-हकने आपल्या कारकिर्दीत एकूण 378 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने 39.52 च्या सरासरीने 11,739 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याचा विक्रमही उत्कृष्ट आहे. त्याने 120 कसोटी सामन्यांमध्ये 49.60 च्या सरासरीने 8,830 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 35 (25 कसोटी आणि 10 एकदिवसीय) आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
हे ही वाचा
IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय
(Inzamam-ul-Haq suffering heart attack sachin tweeted him speedy recovery)