IPL 2022 Auction Prediction: दोन दिवसांनी होणाऱ्या लिलावात ‘हे’ पाच खेळाडू होतील मालामाल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
IPL 2022 Auction: मागच्यावर्षी राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरीसला तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यंदा हा रेकॉर्ड कोणीतरी मोडेल, अशी अपेक्षा आहे.
नवी दिल्ली: IPL च्या पंधराव्या सीजनसाठी बंगळुरुमध्ये येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे. एकूण 590 क्रिकेटपटुंची मेगा ऑक्शनसाठी निवड झाली असून प्रत्येक संघ एक रणनिती आखून या मेगा ऑक्शनमध्ये (Mega Auction) बोली लावणार आहे. प्रत्येक संघाला फक्त चार खेळाडूंना रिटेन (Players Retain) करता आलं आहे. त्यामुळे सर्वच संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात संतुलित संघ नव्याने कसा तयार होईल, त्या दृष्टीने खेळाडूंची निवड करतील. फक्त हा मोसमच नाही, तर भविष्याचा विचार करुन, संघबांधणी केली जाईल. त्यामुळे या लिलावाबद्दल बरीच उत्सुकता आहे. मागची अनेक वर्ष एकाच संघाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना यंदाच्या मोसमात नव्या संघाकडून खेळावे लागणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएल ऑक्शनच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरीस हा सर्वात महागडा खेळाडू आहे. या ऑलराऊडर खेळाडूला मागच्यावर्षी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यंदा हा रेकॉर्ड कोणीतरी मोडेल, अशी अपेक्षा आहे.
क्विंटन डि कॉक – दक्षिण आफ्रिकेचा हा 29 वर्षाचा डावखुरा विकेटकिपर फलंदाज – बेस प्राइस 2 कोटी
क्विंटन डि कॉक विकेटकिपिंग आणि फलंदाजी अशा दुहेरी भूमिका बजावू शकतो. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने आतापर्यंत 2 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मागच्या आठवर्षात तो चार आयपीएल फ्रेंचायजींकडून खेळला. मुंबईकडून खेळताना त्याने पहिल्यांदा आयपीएलच्या जेतेपदाची चव चाखली. 2019 मध्ये मुंबईकडून खेळताना तो सलामीला जायचा. त्यावर्षी मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक 529 धावा केल्या होत्या. 2020 मध्येही मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले. त्यावर्षी त्याने 503 धावा केल्या होत्या. त्याच्यावर लिलावात मोठी बोली लागू शकते.
इशान किशन – भारताचा 23 वर्षीय डावखुरा फलंदाज, बेस प्राइस 2 कोटी
इशान किशन विकेटकिपिंगचे कौशल्य असलेला डावखुरा फलंदाज आहे. आतापर्यंत चार सीजमध्ये त्याने 136.33 च्या सरासरीने 1452 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये मुंबईच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 516 धावा केल्या होत्या. 2018 पासून इशान किशन मुंबईकडून खेळतोय. त्याला 5.5 कोटींना विकत घेतलं होतं. मुंबईकडून खेळताना त्याने दोनदा विजेतेपदाची चव चाखली आहे. भविष्याचा विचार करता त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
डेविड वॉर्नर – ऑस्ट्रेलियाचा 35 वर्षीय डावखुरा फलंदाज, बेस प्राइस 2 कोटी
टी-20 क्रिकेटमधला सर्वात धोकादायक फलंदाज आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 5449 धावा केल्या आहेत. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली टीमने आयपीएलचे जेतेपदही पटकावले आहे. डेविड वॉर्नर अनेकदा वादात सापडला आहे. कुठलाही सामना फिरवण्याची क्षमता वॉर्नरच्या फलंदाजीमध्ये आहे. 2014 मध्ये सनरायजर्स हैदराबादने 5.5 कोटी रुपयांना त्याला विकत घेतलं. 2016 मध्ये वॉर्नच्या नेतृत्वाखाली SRH ने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले. त्याने स्वत: 848 धावा केल्या होत्या. काही कारणांमुळे त्याचं सनरायजर्स हैदराबाद बरोबर बिनसलं. त्यामुळे तो आता हैदराबादकडून खेळत नाही. या ऑक्शनमध्ये वॉर्नरला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी बोली लागू शकते.
श्रेयस अय्यर – 27 वर्षीय फलंदाज – बेस प्राइस 2 कोटी
भारताकडून मधल्याफळीत खेळणाऱ्ंया श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये नेहमीच खोऱ्याने धावा केल्या आहेत. 87 सामन्यात त्याने 31.66 च्या सरासरीने 2375 धावा केल्या आहेत. 2018 मध्ये त्याची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. 2019 मध्ये दिल्लीला प्लेऑफ आणि 2020 मध्ये दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात श्रेयसने महत्त्वाची भूमिका बजावली. श्रेयसने आघाडीवर राहून नेतृत्व करताना 2019 आणि 2020 च्या सीजनमध्ये अनुक्रमे 463 आणि 519 धावा केल्या. 2021 च्या मोसमात खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस बाहेर होता, तेव्हा ऋषभ पंतला कॅप्टन बनवण्यात आलं. दुसऱ्यासत्रात श्रेयस संघात परतला. पण त्याला कॅप्टनशिप दिली नाही. पंतलाच कर्णधारपदी कायम ठेवलं. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये श्रेयसने संघ सोडला. आरसीबी आणि केकेआर संघाकडून कर्णधाराचा शोध सुरु आहे. मूळचा मुंबईचा असलेल्या श्रेयसची या दोन संघांच्या कर्णधारपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी बोलू लागू शकते.
शिखर धवन – 36 वर्षाचा डावखुरा फलंदाज – बेस प्राइस 2 कोटी
शिखर धवनने आयपीएल स्पर्धेत सातत्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. आतापर्यंत शिखरने आयपीएलमध्ये 5784 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये करीयर सुरु करणारा शिखर धवन मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून खेळला आहे. 2014 मध्ये सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्वही केले आहे. धवनसाठी या हंगामात मोठी बोली लागू शकते.