CSK vs PBKS IPL Mathc Result: लिविंगस्टोन ‘हिरो’ पण वैभवचाही दमदार परफॉर्मन्स, पंजाब किंग्सच्या विजयाची तीन कारणं
CSK vs PBKS IPL Mathc Result: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय.
मुंबई: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने आजचा स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली.
- लियाम लिविंगस्टोन हे पंजाब किंग्सच्या विजयाचं मुख्य कारण आहे. आज त्याने 32 चेंडूत 60 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. त्याशिवाय गोलंदाजीतही त्याने दोन विकेट काढल्या. संघाला गरज असताना त्याने शिवम दुबे आणि ड्वेन ब्राव्होची विकेट मिळवून दिली.
- वैभव अरोरा या युवा वेगवान गोलंदाजाने आज प्रभावित केलं. त्याने मोईन अली आणि रॉबिन उथाप्पा हे दोन महत्त्वाचे विकेट काढले. 22 धावात चेन्नईचे तीन फलंदाज तंबूत परतले. तिथेच चेन्नई बॅकफूटवर ढकलली गेली. या युवा गोलंदाजाने चार षटकात 21 धावा देत दोन विकेट काढल्या. वैभव अरोराच्या गोलंदाजीच वैशिष्टय ठरलं चेंडू स्विंग करण्याची त्याची क्षमता. त्याने दोन्ही बाजूला चेंडू उत्तम स्विंग केला.
- पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने कॅप्टन रवींद्र जाडेजाला बोल्ड केलं. तो सुद्धा सामन्याचा एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळी चेन्नईची स्थिती चार बाद 23 झाली. या युवा गोलंदाजाने दोन षटकात 13 धावा देत एक विकेट घेतली.