IPL 2022: शेन वॉर्नच्या मृत्यूचा दिल्ली कॅपिटल्सवर परिणाम, मोठा खेळाडू सुरुवातीचे सामने नाही खेळणार
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स संघासाठी (Delhi Capitals) एक वाईट बातमी आहे. कालच एनरिक नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडला. दिल्लीचा संघ या धक्क्यातून सावरत होता.
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स संघासाठी (Delhi Capitals) एक वाईट बातमी आहे. कालच एनरिक नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडला. दिल्लीचा संघ या धक्क्यातून सावरत असतानाच, आता डेविड वॉर्नरही (David warner) आयपीएलचे सुरुवातीचे सामना खेळणार नसल्याची माहिती आहे. इनसाइड स्पोर्टसने हे वृत्त दिलं आहे. डेविड वॉर्नर सध्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानात आहे. मेलबर्नमध्ये 30 मार्चला शेन वॉर्नवर (Shane warne) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी डेविड वॉर्नर स्वत: उपस्थित रहाणार आहे. लहानपणापासून डेविड वॉर्नरसाठी शेन वॉर्न आदर्श राहिला आहे. डेविड वॉर्नर शेन वॉर्नच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित रहणार असल्याने तो सुरुवातीचे आयपीएल सामने खेळू शकणार नाही. आयपीएल स्पर्धा 26 मार्चपासून सुरु होणार आहे.
मला त्याच्यासारखं बनायचं होतं
“अंत्यविधीसाठी मी 100 टक्के उपस्थित रहणार आहे, असे वॉर्नरने सांगितलं. लाहोरमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर मी घरी परतणार आहे. तिसरा कसोटी सामना 25 मार्चला संपणार आहे. शेन वॉर्नचा खेळ पहातच मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मी माझ्या आदर्शाच्या शेवटच्या प्रवासाला उपस्थित रहाणार आहे” असे वॉर्नरने सांगितले. लहान असताना शेन वॉर्नचे पोस्टर भिंतीवर होते. मला त्याच्यासारखे बनायचे होते, असे वॉर्नर म्हणाला. “हा खूप भावनिक क्षण आहे. अनेक लोक शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहत आहेत” असे तो म्हणाला.
वॉर्नर कधी मुंबईत येणार
मेलबर्नमध्ये 30 मार्चला वॉर्नच्या अंत्यविधीला वॉर्नर उपस्थित असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या दिशानिर्देशानुसार ते पाच एप्रिलपर्यंत मेलबर्नमध्येच असतील. तो पर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कुठल्याही क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली नाही. सहा एप्रिलला वॉर्नर मुंबईत दाखल होईल. बीसीसीआयच्या कोविड नियमांनुसार वॉर्नरला पाच दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोनदा त्याची टेस्ट निगेटिव्ह आली, तरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जाईल.
एनरिक नॉर्खियाही बाहेर
कालच वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडला. एनरिक नॉर्खिया दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. एनरिक नॉर्खिया हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेलं नाही. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा एक झटका आहे. नॉर्खियाला दिल्लीने 6.50 कोटींमध्ये संघात कायम ठेवलं होतं. गेल्या दोन मोसमात नॉर्खियाने चांगली कामगिरी केली होती. नॉर्खियाने 2020 मध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. तर गेल्या मोसमात त्याने 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या.