DC vs RR IPL 2022: कुणाच्या सांगण्यावरुन प्रवीण आमरेंनी मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला? समोर आलं सत्य
DC vs RR IPL 2022: 'सर तुम्ही मैदानात जाऊन अंपायरशी बोलाल की, मी जाऊ', असं ऋषभ पंतने म्हटलं. दिल्लीच्या डगआउटमध्ये उपस्थित असलेल्या सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
मुंबई: IPL 2022 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (DC vs RR) झालेला सामना वादामुळे जास्त चर्चेत आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू पंचांनी नो-बॉल दिला नाही. त्यावरुन सर्व वादाला सुरुवात झाली होती. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh pant) आक्रमक झाला होता. त्याने क्रीझवर असलेल्या कुलदीप यादव आणि रोव्हमॅन पॉवेलला माघारी बोलावलं होतं. या सर्व वादाच्यावेळी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक कोच प्रवीण आमरेही आक्रमक झाले होते. पंत आणि ठाकूर बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या चौथ्या अंपायर बरोबर वाद घालत होते. त्याचवेळी प्रवीण आमरे यांनी मैदानावर जाऊन पंचांकडे विचारणा केली. आता इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवीण आमरेंनी स्वत:हून मैदानात धाव घेतली नव्हती. कॅप्टन ऋषभ पंतच्या सांगण्यावरुन ते मैदानात गेले होते.
म्हणून मग आमरे स्वत:च गेले
‘सर तुम्ही मैदानात जाऊन अंपायरशी बोलाल की, मी जाऊ’, असं ऋषभ पंतने म्हटलं. दिल्लीच्या डगआउटमध्ये उपस्थित असलेल्या सूत्राच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. कॅप्टनने मैदानावर जाऊन पंचांशी बोलणं योग्य दिसणार नाही, म्हणून मग आमरेंनी स्वत:च मैदानात धाव घेतली.
नेमका वाद काय होता?
शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. राजस्थान रॉयल्सकडून ओबेड मेकॉय गोलंदाजी करत होता. समोर दिल्ली कॅपिटल्सचा रोव्हमॅन पॉवेल फलंदाजी करत होता. पॉवेलने आपल्या फलंदाजीने हा सामना रोमांचक वळणावर नेऊन ठेवला. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. पण खऱ्या वादाची सुरुवात इथेच झाली. चेंडू फुलटॉस होता. पॉवेलने चेंडूला थेट सीमारेषेपार पाठवलं. दिल्लीच्या टीमच्या मते हा नो बॉल होता. पण मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला नाही.
“No Ball” It’s a gully cricket stuff from rishabh pant u can’t intervene match like that & tell your batsman walk off the field like that pic.twitter.com/C8DrtfAz1U
— protea_ fire? (@Sacricketfa) April 22, 2022
कोणाला मिळाली शिक्षा?
दिल्लीच्या काही खेळाडूंना या वादाची किंमत चुकवावी लागली आहे. कॅप्टन ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांना इंडियन प्रीमियर लीगच्या अचारसंहितेच उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरण्यात आलय. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. ऋषभ पंतची मॅच फी मधली 100 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. ठाकूरची 50 टक्के तर प्रवीण आमरे यांचीही मॅच फी मधली 100 टक्के रक्कम कापण्यात येईल. त्याशिवाय त्यांच्यावर एक मॅचची बंदीही घालण्यात आलीय.