IPL 2022 DC vs MI: ‘कॅप्टन म्हणून ऋषभमध्येही रोहित सारखेच…’, कोच रिकी पाँटिंग म्हणाले….
IPL 2022 DC vs MI: भारतीय संघातून एकत्र खेळणारे रोहित आणि ऋषभ उद्या आयपीएलमध्ये परस्परांसमोर उभे ठाकणार आहेत. रोहित सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे.
मुंबई: ऋषभ पंतही (Rishabh Pant) रोहित शर्मा (Rohit sharma) सारखं कॅप्टन म्हणून यश मिळवू शकतो, असा विश्वास दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi capitals) हेड कोच रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केला आहे. भारतीय संघातून एकत्र खेळणारे रोहित आणि ऋषभ उद्या आयपीएलमध्ये परस्परांसमोर उभे ठाकणार आहेत. रोहित सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे, तर ऋषभ पंतकडे भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहिलं जातय. त्यामुळे उद्या ते कॅप्टन म्हणून मैदानावर रणनितीची कशी अमलबजावणी करतात, कसे निर्णय घेतात? याकडे क्रिकेटच्या जाणकारांचे लक्ष असेल. रोहित कॅप्टन म्हणून यशस्वी आहे तर ऋषभ पंतही दमदार फॉर्म मध्ये आहे. 15 व्या मोसमात दोन्ही संघ आपला पहिला सामना खेळतायत. त्यामुळे विजयी शुभारंभ करण्याकडे त्यांचा कल असेल.
पंतमध्ये तेच सगळे गुण
रोहित सर्वप्रथम मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला. रिकी पाँटिंग फ्लॉप ठरत असल्यामुळे ऐनवेळी त्याच्याकडे कॅप्टनशिपची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर रोहितने मागेवळून पाहिलं नाही. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच जेतेपद पटकावली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार पाँटिंग आता, दिल्लीचा मुख्य रणनितीकार आहे. दिल्लीचा संघ आणि खेळाडूंचा मुख्य मार्गदर्शक आहे. रोहित सारखं यश मिळवण्याचे सर्व गुण पंतमध्ये आहेत, असे पाँटिंग म्हणाले. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलं आहे.
फक्त काही खेळाडू येऊं दे, मग…
“आम्ही या बद्दल जास्त बोललो नाहीय. मोसमातील पहिल्या सामन्याकडे आमचं लक्ष आहे. आमच्याकडे जे आहे, त्यानुसार आम्ही खेळू. टिम सीफर्ट, रोवमॅन पॉवेल, मुस्तिफिजुर रहमान, एनरिक नॉर्खिया लुंगी निगीडी सारखे खेळाडू आमच्याकडे आहेत. चांगली सुरुवात करण्याची आमची क्षमता आहे. काही खेळाडू संघात परतल्यानंतर आमची ताकत आणखी वाढेल” असे पाँटिंग म्हणाला.
रोहितही त्याच वयाचा होता
“रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, त्यावेळी तो तरुण होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं सुरु केलं होतं. आज ऋषभ पंतच जितक वयं आहे, रोहितही त्यावेळी त्याच वयाचा होता. त्यांच्यात काही समान गुण आहेत” असं पाँटिंग म्हणाला.