IPL 2022: CSK ला आणखी एक मोठा झटका, दीपक चाहर पाठोपाठ आणखी एक गोलंदाज बाहेर, नव्या ‘मलिंगा’चा संघात समावेश
IPL 2022: IPL 2022 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज एडम मिल्ने यापुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीय.
मुंबई: IPL 2022 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज एडम मिल्ने यापुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीय. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करतोय. एडम मिल्नेच्या (Adam Milne) जागी सीएसकेने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाचा (Matheesha Pathirana) संघात समावेश केला आहे. तो 19 वर्षांचा वेगवान गोलंदाज आहे. पाथिरानाची गोलंदाजी ACTION लसिथ मलिंगाशी मिळती-जुळती आहे. गोलंदाजी ACTION मुळे मथीशा पाथिरानाला ‘लिटिल मलिंगा’ म्हटलं जातं. मथीशा पाथिराना 2020 च्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेकडून खेळला आहे. त्याशिवाय 2022 मध्येही तो श्रीलंकन संघाचा भाग होता. 2022 अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने 27.28 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या. त्याचा इकॉनमी रेट 6.16 आहे.
तो उत्कृष्ट यॉर्कर टाकतो
त्याच्या गोलंदाजीला चांगला पेस आहे. तो उत्कृष्ट यॉर्कर चेंडू टाकतो. मथीशा पाथिराना 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. सिनियर स्तरावर मथीशा पाथिराना अजून जास्त सामने खेळलेला नाही. त्याच्या नावावर लिस्ट आणि दोन टी 20 सामने आहेत. लिस्ट ए मध्ये त्याला अजून एकही विकेट मिळालेला नाही. दोन टी 20 सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत. तो बऱ्याच आधीपासून सीएसकेच्या रडारवर होता. 2021 सीजनच्या आधी महीश तीक्ष्णा सोबत पाथिराना रिझर्व्ह प्लेयर मध्ये ठेवण्यात आले होते.
Adam Milne to miss IPL 2022 due to injury. Wishing him a minnal recovery to be up and running in a flash soon!#WhistlePodu #Yellove ?? @AdamMilne19
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2022
एडम मिल्ने न्यूझीलंडचा गोलंदाज
एडम मिल्ने न्यूझीलंडचा गोलंदाज आहे. आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात तो खेळला आहे. केकेआर विरुद्धच्या सामन्यात सीएसकेने त्याला प्लेइंग इलेवनमध्ये संधी दिली होती. मात्र त्याचवेळी त्याला दुखापत झाली. एडम मिल्ने फक्त 2.3 षटकं टाकू शकला. त्यानंतर तीन आठवड्यांसाठी तो खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली. पण आता तो संपूर्ण 2022 च्या सीजनसाठीच संघातून बाहेर गेला आहे.