IPL 2022 Auction: आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक पैसा कमावणारे ‘हे’ आहेत महागडे खेळाडू
IPL 2022 Auction:
बंगळुरु: IPL 2022 च्या 15 व्या सीजनसाठी बंगळुरमध्ये मेगा ऑक्शन (Mega Auction) सुरु आहे. तब्बल चार वर्षानंतर मेगा ऑक्शन होत आहे. यापूर्वी 2018 मध्ये मेगा ऑक्शन झालं होतं. सर्व संघांनी ऑक्शनसाठी रणनिती ठरवली आहे. फक्त हा सीजनच नाही, तर भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याच्या हेतूने प्रत्येक संघ खेळाडूंना विकत घेईल. ऑक्शनचं पहिल सत्र संपलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या (Kings punjab) पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी रुपये आहेत तर दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात कमी 47.50 कोटी रुपये आहेत. पहिल्या सत्रातल्या महागड्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया
पहिल्या सत्रात श्रेयस अय्यर महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाइट राजडर्सने तब्बल 12.25 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं. श्रेयस केकेआरचा कॅप्टन बनू शकतो. कारण सध्या त्यांच्याकडे दुसरा कुठलाही कर्णधार नाहीय.
9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्जने कगिसो रबाडाला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी आहेत. त्यांनी तीनच खेळाडूंना रिटेन केलं आहे. पंजाबने आतापर्यंत दोन खेळाडू विकत घेतले आहे.
पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर शिखर धवनला आपल्या संघात घेतलं आहे. धवनसाठी दिल्लीने 8 कोटींपर्यंत बोली लावली. अखेर गेल्या वर्षी दिल्लीकडून खेळलेला धवन यंदा पंजाबकडून खेळणार आहे.
राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. बोल्टवर मुंबईने 7.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र राजस्थानने अखेर मुंबईचा खेळाडू आपल्याकडे घेतला.
कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सवर 7.25 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. गेल्या वर्षी त्याच्यावर कोलकात्याने 15 कोटींची बोली लावली होती. कमिन्स आता पुन्हा एकदा कोलकात्याकडून खेळणार आहे.