IPL Mega auction 2022: ठरलं! राहुल लखनऊचा कॅप्टन, कोणाला किती कोटी मिळणार, पैशांचं गणित समजून घ्या…
मेगा ऑक्शनआधी अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायजीना त्यांच्या प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंची यादी सोपवावी लागणार आहे.
लखनऊ: इंडियन प्रिमियर लीगच्या बहुचर्चित मेगा ऑक्शनची (IPL Mega auction 2022) चाहत्यांप्रमाणेच टीम्स देखील तितकीच आतुरतेने वाट पाहत आहेत. मेगा ऑक्शनआधी अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायजीना त्यांच्या प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंची यादी सोपवावी लागणार आहे. लखनऊ फ्रेंचायजी केएल राहुल, (KL Rahul) मार्कस स्टोइनिस आणि रवी बिष्णोई या तीन खेळाडूंना करारबद्ध करणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे.
पैशांच गणित असं आहे
ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलला लखनऊ फ्रेंचायजीने नंबर 1 खेळाडू म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्याला निर्धारीत फीस स्लॅबनुसार 15 कोटी रुपये दिले जातील. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसला नंबर 2 खेळाडू म्हणून निवडलं आहे. त्याला 11 कोटी रुपये दिले जातील. रवी बिष्णोईला चार कोटी रुपये मिळतील. यामुळे लखनऊ फ्रेंचायजीकडे लिलावाच्यावेळी खरेदीसाठी 60 कोटी रुपये पर्समध्ये असणार आहेत.
RPSG ग्रुपने 7090 कोटी रुपये मोजले
लखनऊचा संघ पहिल्यांदा आयपीएलमध्ये सहभागी होतोय. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ आहे. RPSG ग्रुपने 7090 कोटी रुपये मोजून लखनऊ संघाचे हक्क विकत घेतले आहेत. भारताची माजी क्रिकेटपटू आणि KKR चा माजी कॅप्टन खासदार गौतम गंभीर लखनऊ संघाचा मार्गदर्शक आहे. झिम्बाब्वेचा माजी खेळाडू अँडी फ्लॉवर या संघाचे हेड कोच आहेत. उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याआधी राहुलने किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद भूषवलं आहे.