IPL 2022: Mumbai Indians ला त्याचं महत्त्व कळलं नाही, 6 मॅच बाहेर बसवलं, अखेर 9 चेंडूत त्याने मिळवून दिला पहिला विजय
IPL 2022: दोन चौकार आणि एका षटकारासह त्याने नाबाद 20 धावा केल्या व टीमला पहिला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या 67 धावांच्या बळावर सहा विकेट गमावून 158 धावा केल्या.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून ते आधीच बाहेर गेले आहेत. सलग आठ सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या टीमची पहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर काल संपली. मुंबई इंडियन्सने काल राजस्थान रॉयल्सवर (MI vs RR) यंदाच्या सीजनमधला पहिला विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने विजयाचं खात उघडलं असून त्यांनी पाच विकेट राखून राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईचा संघ इतके सामने हरलाय. मुंबईच्या कालच्या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. पण सामना अटी-तटीचा झाला होता. त्यावेळी एका खेळाडूने सूर्यकुमारने जो पाया रचला, त्यावर कळस चढवण्याचं काम केलं. या खेळाडूचं नाव आहे टिम डेविड.
तो अखेरीस आला
टिम डेविड अखेरीस आला. त्याने नऊ चेंडूंचा सामना केला. यात दोन चौकार आणि एका षटकारासह त्याने नाबाद 20 धावा केल्या व टीमला पहिला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या 67 धावांच्या बळावर सहा विकेट गमावून 158 धावा केल्या. मुंबईने काल चार चेंडू राखून विजय मिळवला.
मुंबईने 8.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं
टिम डेविड बिग बॅश लीग मध्ये छाप उमटवून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आला आहे. मुंबईने लिलावात 8.25 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं होतं. मुंबई इंडियन्साठी टिम डेविड तिसरी मॅच खेळला. याआधी डेविडला पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. पण तो आपल्या कामगिरीने प्रभावित करु शकला नव्हता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केला. त्या मॅचमध्ये त्याने फक्त 12 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात फक्त एक रन्स करुन तो आऊट झाला होता.
पहिला विजय आधीच मिळाला असता
कालचा त्याचा तिसरा सामना होता. त्याने तशा कमी धावा केल्या. पण संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. टिम डेविड हा आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मुंबई इंडियन्सने त्याला आधी जास्त खेळवलं असतं, तर कादचित पहिला विजय आधीच मिळाला असता.
That precious moment ??#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #RRvMI #TATAIPLpic.twitter.com/o9QfPe896i
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2022
रहाणारा ऑस्ट्रेलियाचा खेळतो सिंगापूरकडून
टिम डेविड पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळत नाहीय. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा भाग होता. मागच्या सीजनमध्ये त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळाली होती. टिम डेविड रहाणारा ऑस्ट्रेलियाचा आहे. पण तो सिंगापूरकडून क्रिकेट खेळतो. सिंगापूरसाठी टिम डेविड 14 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. 558 धावा केल्यात. त्याच्या नावावर चार अर्धशतक आहेत.