Mumbai Indians IPL 2022: सलग आठ पराभवानंतर अखेर हेड कोच जयवर्धनेंचा संयम सुटला, इशान किशनबद्दल म्हणाले….
Mumbai Indians IPL 2022: पराभवानंतर कुठल्याही संघात गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. आता मुंबई इंडियन्सच्या संघातही हेच होताना दिसतय. मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहेला जयवर्धने यांनी अखेर इशान किशनच्या खेळाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
मुंबई: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका अजून थांबलेली नाही. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) 36 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत सलग आठ सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्स अजून आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणं, जवळपास अशक्यच आहे. पराभवानंतर कुठल्याही संघात गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. आता मुंबई इंडियन्सच्या संघातही हेच होताना दिसतय. मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहेला जयवर्धने यांनी अखेर इशान किशनच्या खेळाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध इशान किशनने खूपच खराब प्रदर्शन केलं. या डावखुऱ्या फलंदाजाने 20 चेंडूत फक्त आठ धावा केल्या. पत्रकार परिषदेत माहेल जयवर्धने यांनी इशान किशन विरोधात वक्तव्य केलं आहे. “इशान किशनवर जी जबाबदारी सोपवली होती, तो ती पूर्ण करु शकलेला नाही” असं जयवर्धन म्हणाले.
माहेल जयवर्धने यांनी प्रथमच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
“आम्ही इशान किशनला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण तो चांगली कामगिरी करु शकला नाही. आम्हाला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती” असं माहेल जयवर्धने सलग आठ पराभवानंतर म्हणाले. माहेल जयवर्धने यांनी प्रथमच मुंबई इंडियन्सच्या कुठल्या खेळाडूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मागच्या सात सामन्यापर्यंत ते प्रत्येक खेळाडूसोबत होते. पण आता त्यांचा संयम सुटत चालला आहे. इशान किशनने या सीजनमध्ये खूपच खराब प्रदर्शन केलं आहे. इशानने पहिल्या सामन्यात नाबाद 81 धावांची खेळी केली. पण त्यानंतर पुढच्या सहा सामन्यात तो फ्लॉप ठरला आहे.
फक्त इतक्या धावा केल्या
मागच्या सात डावात इशान किशनने फक्त 118 धावा केल्या आहेत. इशानचा स्ट्राइक रेट फक्त 108 आहे. मुंबई इंडियन्सने या खेळाडूवर 15.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केली होती. पण इशानला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. इशान किशनच नाही, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड हे सुद्घा प्रभावी कामगिरी करु शकलेले नाहीत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह वगळता एकही गोलंदाज प्रभावी ठरलेला नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा अजून संघर्षच सुरु आहे.