Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड
Rohit Sharma Fined, IPL 2022: एकवेळ मुंबई हा सामना सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण दिल्लीने पुनरागमन केलं आणि मुंबईच विजयी शुभारंभाचा स्वप्न भंग पावलं.
मुंबई: आयपीएल 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला विजयाने सुरुवात करता आली नाही. रविवारी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) चार विकेट राखून पराभव केला. एकवेळ मुंबई हा सामना सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण दिल्लीने पुनरागमन केलं आणि मुंबईच विजयी शुभारंभाचा स्वप्न भंग पावलं. पराभवाबरोबरच मुंबई इंडियन्सला आणखी एक वाईट बातमी मिळाली आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) खिसा रिकामा करावा लागला आहे. रोहितला षटकांची गती धीमी राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आलाय. आयपीएलने रविवारी रात्री पत्रक जारी करुन या बद्दलची माहिती दिली. रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. “मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध षटकांची गती धीमी ठेवली. या सीजनमधला टीमने हा पहिला नियम मोडला आहे. यासाठी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे”
ललित यादव-अक्षर पटेलमुळे विजय हिरावला
ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या जबरदस्त खेळाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. खरंतर या सामन्यात एक वेळ अशी होती की, मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण मुंबई इंडियन्सने हा सामना चार विकेटने गमावला. ललित यादव आणि अक्षर पटेलने सातव्या विकेटसाठी 30 चेंडूत नाबाद 75 धावांची भागीदारी केली.
ललित यादव नाबाद (48) आणि अक्षर पटेलने नाबाद (38) धावा केल्या. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या. एकवेळ दिल्लीची अवस्था सहाबाद 104 अशी होती. पण अखेरीस त्यांनी 10 चेंडू राखून विजय मिळवला. आयपीएलमध्ये सलामीचा सामना न जिंकण्याचा सिलसिला मुंबईने कायम राखला आहे.
अश्विनने त्याला क्लीन बोल्ड केलं
दिल्ली कॅपिटल्सला टिम सायफर्टने दमदार सुरुवात करुन दिली होती. तो स्फोटक फलंदाजी करत होता. अश्विनने त्याला क्लीन बोल्ड केलं. सायफर्टने 21 धावा केल्या. त्यानंतर मनदीप सिंहला भोपळाही फोडू न देता तिलक वर्माकरवी अश्विनने झेलबाद केलं. कॅप्टन ऋषभ पंतही अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. वेगवान गोलंदाज मिल्सने त्याला डेविड करवी झेलबाद केले. एकाबाजूने दमदार फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ ही बाद झाला. बासील थंपीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा जबरदस्त झेल घेतला.
तिथेच सामना दिल्लीच्या बाजूने झुकला.
पृथ्वी शॉ ने 38 धावा केल्या. दिल्लीची स्थिती तेव्हा चार बाद 72 होती. शार्दुल ठाकूर बाद झाला, तेव्हा मुंबई हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण ललित यादव नाबाद (48) आणि अक्षर पटेलने नाबाद (38) मुंबईचा विजयाचा घास हिरावला. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज मार खाल्ला. त्याने 3.2 षटकात 43 धावा दिल्या. डॅनियल सॅम्सने तर 17 व्या षटकात 24 धावा दिल्या. तिथेच सामना दिल्लीच्या बाजूने झुकला.