Hardik pandya SRH vs GT: कानाजवळ उमरानचा बाऊन्सर शेकला, त्यानंतर हार्दिकने बॅटनेच दिलं प्रत्युत्तर, एक रेकॉर्डही बनवला
Hardik pandya SRH vs GT: सनरायजर्स हैदराबादचा संघ (SRH) भले या सीजनमध्ये अजूनही अडखळतोय. त्यांना चांगली सुरुवात करता आलेली नाही. पण या टीममधल्या एका वेगवान गोलंदाजाने सर्वांच लक्ष वेधून घेतलय.
मुंबई: सनरायजर्स हैदराबादचा संघ (SRH) भले या सीजनमध्ये अजूनही अडखळतोय. त्यांना चांगली सुरुवात करता आलेली नाही. पण या टीममधल्या एका वेगवान गोलंदाजाने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. त्या गोलंदाजाचं नाव आहे उमरान मलिक. मागच्या सीजनमध्ये हा गोलंदाज सर्वांच्या नजरेत आला होता. यंदाच्या सीजनमध्येही तो आपल्या वेगवान गोलंदाजींने सर्वांना प्रभावित करतोय. आज गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने उमरान मलिकच्या गोलंदाजीचा सामना (Umaran Malik vs Hardik pandya) केला. क्रिकेटप्रेमींना दोघांमध्ये एक चांगली लढत पहायला मिळाली. हार्दिक पंड्याने या दरम्यान एक रेकॉर्डही (IPL 2022 Record) आपल्या नावावर केला. या सीजनमध्ये गुजरात टायटन्सची कॅप्टनशिप करणारा हार्दिक संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही हा सिलसिला कायम राहिला व सहाव्या षटकातच हार्दिकला फलंदाजीसाठी मैदानात याव लागलं.
उमरान त्याचं पहिलच षटक टाकत होता
आठव्या षटकात त्याचा सामना वेगवान गोलंदाज उमरान मलिक बरोबर झाला. उमरान त्याचं पहिलच षटक टाकत होता. या ओव्हरची सुरुवात ज्या पद्धतीने झाली, त्याची कल्पना हार्दिकनेही केली नसेल.
हेल्मेटवर आदळला बाऊन्सर
उमरानने पहिलाच चेंडू शॉर्ट टाकला. या बॉलवर पुल शॉट खेळण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला. चेंडू थेट हेल्मेटच्या ग्रीलवर आदळला. या चेंडूने हार्दिकला चकवलं आणि एका लढतीची सुरुवात झाली. बॉल लागल्यानंतर हार्दिकने स्वत:ला सावरलं व लगेच फलंदाजी सुरु केली. त्याने उमरानला बॅटनेच जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पुढच्या चेंडूवर प्रहार
उमरानने पहिला चेंडू चांगला टाकला होता. पण दुसऱ्याच चेंडूवर हार्दिकने प्रतिहल्ला चढवला. चेंडूला कव्हर्सच्या दिशेने सीमापार धाडलं. उमरानने पुन्हा पुढचा चेंडू शॉर्ट टाकला. हार्दिक तयारच होता. त्याने यावेळी कोणतीही चूक न करता पुलचा फटका खेळून चेंडू सीमापार धाडला.
Su vaat ‘Chhe’ x ? ?#SeasonOfFirsts #AavaDe #SRHvGT pic.twitter.com/PMoQPUh1nI
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 11, 2022
हार्दिकने हाफ सेंच्युरीसह बनवला रेकॉर्ड
हार्दिक शेवटपर्यंत क्रीजवर टिकून होता. त्याने 42 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि एक षटकार होता. हार्दिकने आजच्या मॅचमध्ये भले एक सिक्स मारला असेल, पण त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. हार्दिक आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान 100 षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. हार्दिकने 1046 चेंडूत 100 षटकार पूर्ण केले. आंद्रे रसेलने 657 चेंडू आणि ख्रिस गेलने 943 चेंडून आयपीएलमध्ये 100 षटकार ठोकले आहेत.