IPL 2023 साठी नवीन नियम, अटीतटीच्या प्रसंगात ‘या’ अधिकारामुळे फिरु शकते मॅच
IPL 2023 : टीमच्या कॅप्टनला मिळाला महत्त्वाचा अधिकार. अटीतटीच्या प्रसंगात कॅप्टनने हा अधिकार वापरल्यास सामना फिरु शकतो. WPL च्या पहिल्या सीजनमध्ये या नियमाचा प्रयोग करण्यात आला.
IPL 2023 : WPL च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरने वाइड बॉलवर DRS घेतला होता. हरमनप्रीतने DRS घेतल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण त्यावेळी अनेकांना या नियमाची पूर्ण माहिती नव्हती. WPL च्या पहिल्या सीजनमध्ये या नियमाचा प्रयोग करण्यात आला. आता IPL 2023 मध्ये सुद्धा हाच नियम लागू करण्यात येणार आहे. तिथे सुद्धा खेळाडू या नियमांचा पुरेपूर फायदा उचलू शकतात. अंपायरच्या निर्णयाविरोधात DRS घेण्याचा अधिकार असेल.
T20 लीगच्या इतिहासात पहिल्यांदा खेळाडूंना वाइड आणि नो-बॉलच्या निर्णयावर रिव्यू घेण्याची सवलत मिळाली आहे. WPL म्हणजे वूमेन्स प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा या अधिकाराचा वापर करण्यात येतोय. आता आयपीएलमध्ये सुद्धा या नियमाचा प्रयोग केला जाईल.
वाइड आणि नो बॉलवर DRS चा प्रयोग
खेळाडू आता वाइड आणि नो बॉल विरोधात DRS चा वापर करतील. प्रत्येक इनिंगमध्ये दोन चान्स असतील. लेग बायच्या निर्णयावर DRS घेता येणार नाही.
WPL च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये प्रयोग
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या 2 सामन्यात खेळाडूंनी या नव्या नियमाचा बिनधास्तपणे फायदा उचलला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सच्या सामन्यात पहिल्यांदा वाइड बॉलवर DRS घेण्याात आला. मुंबईची स्पिनर साइका इशाकचा चेंडू वाइड देण्यात आला. मुंबईने DRS घेतला आणि अंपायरला निर्णय बदलावा लागला.
नो-बॉलसाठी घेतला DRS
टुर्नामेंटच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची फलंदाज जेमिना रॉड्रिग्जने या नियमाचा फायदा उचलला. तिने मेगानच्या फुल टॉस चेंडूवर चौकार मारला. ऑन फिल्ड अंपायरने हा चेंडू नो-बॉल दिला नाही. जेमिमाने त्या विरोधात DRS घेतला. पण अंपायरने निर्णय बदलला नाही. नवीन नियम अंपायरना पटलेला नाही
ICC च्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांना हा निर्णय पटलेला नाही. वाइड आणि नो-बॉलसाठी T20 क्रिकेटमध्ये रिव्यू घेऊ नये, असं टॉफेल ESPNcricinfo सोबत मागच्यावर्षी झालेल्या चर्चेत म्हणाले होते.