Video: निकोलस पूरन अडकला धोनी रिव्ह्यू सिस्टममध्ये, तळहात क्रॉस करताच आऊट झाल्याचं कन्फर्म
आयपीएल 2025 स्पर्धेतील 30वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज आणि नंतर पडणारं दव हे गणित बांधून त्याने निर्णय घेतला. पण या सामन्यात चर्चा रंगली ती धोनीच्या रिव्ह्यूची..

आयपीएल 2025 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीचं नेतृत्व पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. पण महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर फार अपेक्षा आहे. असं असताना संघाला विजयी ट्रॅकवर आणण्यचा प्रयत्न सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना चेन्नईसाठी खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना धोनीच्या नेतृत्वगुणाची पुन्हा एकदा पारख झाली आहे. या सामन्यात सर्वात घातक फलंदाज निकोलस पूरन आहे याची जाणीव सर्वांना होती. कारण पूरन टिकला तर सामना फार पुढे नेईल याची जाणीव होती. त्यामुळे त्याला झटपट बाद करणं हे मोठं आव्हान होतं. दोन चौकार मारून निकलसने चार्ज करण्यास सुरुवात केली होती. पण त्याचा खेळ 9 व्या चेंडूवरच आटोपला. अंशुल कंबोज चौथं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या सहाव्या चेंडूवर पूरन फटका मारताना चुकला आणि चेंडू पायावर आदळला.
अंशुल कंबोज आणि इतर खेळाडूंनी जोरदार अपील केलं. पण पंचांना नाबाद असल्याचं सांगितलं. मग काय महेंद्रसिंह धोनीचा हात वर आला आणि रिव्ह्यू घेतला. महेंद्रसिंह धोनीने रिव्ह्यू घेणं म्हणजे फलंदाज बाद असल्याचे संकेत असतात. झालंही तसंच रिव्ह्यूत चेंडू बरोबर लाईनमध्ये पडला होता आणि स्टप्स घेऊन जात होता. त्यामुळे फिल्डवरील पंचांना निर्णय बदलावा लागला आणि बाद घोषित करावं लागलं. घातक फलंदाज असलेला निकोलस पूरन फक्त 8 धावा करून बाद झाला.
It’s still Dhoni Review System (DRS) pic.twitter.com/kaC24u6roF
— Cricket (@Kricketvideos) April 14, 2025
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या. तसेच विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं. लखनौ सुपर जायंट्सकडून ऋषभ पंतने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याच्या खेळीमुळे 150 पार धावांचा पल्ला गाठता आला. खरं तर या मैदानावर हा स्कोअरही मोठा आहे. पण नंतर पडणारं दव पाहता धावा होणं सहज सोपं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सकडे या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे. आता चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.