LSG vs MI : मार्श-मारक्रम सलामी जोडीची अर्धशतकी खेळी, मुंबईसमोर 204 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Lucknow Super Giants vs Mumbai Indians 1st Innings Highlights : मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या सलामी जोडीने केलेल्या अर्धशतकी जोरावर लखनौ सुपर जायंट्सने मुंबईसमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 203 धावा केल्या. लखनौसाठी मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 60 रन्स केल्या. तर मारक्रमने 53 धावांचं योगदान दिलं. तसेच मधल्या फळीत आयुष बदोनी आणि डेव्हीड मिलर या दोघांनी निर्णायक खेळी केली. त्यामुळे लखनौला 200 पार मजल मारता आली. तर मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात काय झालं?
मुंबईने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने लखनौला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी 76 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिचेल मार्श 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह 60 रन्स करुन आऊट झाला. मुंबईने लखनौला काही धावांनंतर दुसरा झटका दिला. कर्णधार हार्दिक पंड्या याने स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याला 12 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. हार्दिकने पंतला 2 धावावंर कॉर्बिन बॉश याच्या हाती कॅच आऊट केलं.
त्यानंतर एडन मारक्रम आणि आयुष बदोनी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 51 धावा जोडल्या. आयुष 19 बॉलमध्ये 30 रन्स करुन माघारी परतला. मुंबईने इथून पुन्हा एकदा लखनौ ठराविक अंतराने झटके दिले. मात्र त्यानंतरही लखनौ 200 पार पोहचण्याच यशस्वी ठरली. आयुषनंतर एडन मारक्रम 53, अब्दुल समद 4 आणि डेव्हिड मिलर 27 धावा करुन आऊट झाले. मुंबईसाठी हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हार्दिकला त्याव्यतिरिक्त अपवाद वगळता इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे लखनौला 200 पार पोहचता आलं. ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथुर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर दीपक चाहर आणि मिचेल सँटनर या दोघे विकेट घेण्यात अपयशी ठरले.
मुंबईसमोर 204 धावांचं आव्हान
Innings Break!#LSG set a target of 2️⃣0️⃣4️⃣ courtesy of half-centuries from Mitchell Marsh and Aiden Markram!
Will #MI register a consecutive win in #TATAIPL 2025?#LSGvMI pic.twitter.com/JrAG5JK1vn
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.