IPL 2025 Point Table : दिल्ली पुन्हा दुसऱ्या स्थानीच, आता 10 पैकी इतके सामने जिंकले की झालं
आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्यांच्याच होमग्राउंडवर लोळवत विजयी चौकार मारला आहे. सलग चार विजयांसह दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत दुसऱ्याच स्थानी आहे. पण या विजयासह दिल्लीचं प्लेऑफचं गणित सोपं झालं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स हा सर्वात यशस्वी संघ ठरताना दिसत आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु आहे. आयपीएलच्या 24 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. आरसीबीने 20 षटकात 7 गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 17.5 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. पण गुणतालिकेत अव्वल स्थान काही गाठता आलं नाही. नेट रनरेटचं गणित कमी पडल्याने दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. गुजरात टायटन्सचा संघ पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवून 8 गुण आणि +1.413 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.
तर दिल्ली कॅपिटल्सने सलग चार सामन्यात विजय मिळवल्याने 8 गुण आणि +1.278 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 5 पैकी 3 सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव सहन केला आहे. यासह त्यांच्या खात्यात 6 गुण आणि +0.539 नेट रनरेट इतका झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानी आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट कमी झाला आहे. पंजाब किंग्सने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवून 6 गुणांसह+0.289 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे.
लखनौ सुपर जायंट्सने पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवून 6 गुण आणि +0.078 नेट रनरेट आहे. यासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स 4 गुण आणि -0.056 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर, राजस्थान रॉयल्स 4 गुण आणि -0.733 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स पाच पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे खात्यात फक्त 2 गुण असून -0.010 नेट रनरेटसह आठव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स 2 गुण आणि -0.889 नेट रनरेटसह नवव्या, सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि -1.629 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅपिटल्सला आता फक्त 4 विजयांची गरज
आयपीएल स्पर्धेत प्लेऑफचं गणित सोडवायचं तर 16 गुण होणं आवश्यक आहे. म्हणजेच हा आकडा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सुरक्षित मानला जातो. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे अजून 10 सामने खेळायचे बाकी आहेत. या दहा पैकी 4 सामन्यात विजय मिळवला की 16 गुण होतील. म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सकडे बॅकअपसाठी 6 सामने आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स सलग चार विजयासह प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे.