IPL Points Table 2025 : पॉइंट्स टेबलमध्ये बॅकबँचर्सचा दबदबा, दिग्गज ढेर, पहिल्या स्थानी नवा संघ
Ipl 2025 Latest Points Table Ranking : गुजरात टायटन्सने 9 एप्रिलला राजस्थान रॉयल्सवर जबरदस्त विजय मिळवला. या सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं आहे. टॉप 5 मध्ये गुजरातचा अपवाद वगळता एकही स्कॉलर टीम नाही.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात 9 एप्रिलपर्यंत एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामातील 23 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला. गुजरातने राजस्थानवर 58 धावांनी मात करत एकूण आणि सलग चौथा विजय मिळवला. तर राजस्थानची या पराभवासह विजयी हॅटट्रिकची संधी हुकली. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं आहे. गुजरातने दिल्ली कॅपिट्ल्सला पछाडत टॉप केलं आहे. गुजरातने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत तर एकमेव सामना गमावला आहे. गुजरातच्या खात्यात गुण आहेत. तर राजस्थानने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 3 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. राजस्थान 4 गुणांसह सातव्या स्थानी विराजमान आहे.
गुजरातने राजस्थानला पराभूत केल्याने दिल्लीला फटका बसलाय. दिल्लीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्या, पंजाब किंग्स चौथ्या आणि लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या स्थानी आहे. टॉप 5 मधून गुजरात टायटन्सचा अपवाद वगळता उर्वरित एकाही संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. थोडक्यात सांगायचं तर टॉप 5 मध्ये बॅकबँचर्सचा दबदबा पाहायला मिळत आहे. गुजरात आणि लखनौ या दोन्ही संघांनी 2022 साली आयपीएल पदार्पण केलं होतं. गुजरातने पदार्पणातच हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती.
गतविजेता टॉप 5 मधून बाहेर
दरम्यान गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासह अपयश येत असल्याचं दिसून येत आहे. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आहे. केकेआरने एकूण 3 वेळा तर राजस्थानने एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तसेच आठव्या आणि नवव्या स्थानी आयपीएलच्या इतिहासातील 2 सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई इंडियन्स आठव्या आणि चेन्नई सुपर किंग्स नवव्या क्रमांकावर आहे. तर शेवटून पहिल्या अर्थात दहाव्या क्रमांकावर गेल्या हंगामातील उपविजेता संघ सनरायजर्स हैदराबाद आहे. हैदराबादने 2016 साली डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. या 4 संघांनी मिळून एकूण 15 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या 4 पैकी कोणतीही एक टीम टॉप 5 मध्ये नाही. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये बॅकबँचर्सचा वरचष्मा पाहायला मिळत आहे.
गुजरात टायटन्स ‘एक नंबर’
Feels so good 😎 pic.twitter.com/6XPAdfcip2
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 9, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.