आयपीएलमध्ये या खेळाडूंवर असेल बंदी! फ्रेंचायझींनी बीसीसीआयकडे केली कठोर कारवाईची मागणी
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यासाठी आतापासूनच खलबतं सुरु झाली आहेत. लिलावाच्या नियमांसाठी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझी मालकांची मुंबईत 31 जुलैला बैठक होणार आहे. या बैठकीत फ्रेंचायझी मालक एक मुद्दा उचलण्याच्या तयारीत आहेत. कारण मागच्या काही आयपीएल स्पर्धांमध्ये फ्रेंचायझींना फटका बसला होता.
आयपीएल स्पर्धेचा संपूर्ण जगभरात नावलौकिक आहे. जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. या स्पर्धेची 17 पर्व यशस्वीरित्या पार पडली आहेत. तसेच फ्रेंचायझी आणि खेळाडूंनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या लीगमध्ये खेळण्याचं खेळाडूंचं स्वप्न असणार यात शंका नाही. त्यामुळे लिलाव आणि त्याच्या रकमेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून असतं. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि फ्रेंचायझींमध्ये खलबतं सुरु आहेत. पुढच्या पर्वासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी 31 जुलैला मुंबईच्या बीसीसीआय कार्यालयात बैठक बोलवली आहे. मेगा ऑक्शनसाठी सॅलरी पर्स, खेळाडूंची रिटेनशन संख्या, राईट टू मॅच आणि इम्पॅक्ट प्लेयर नियमांवर महत्त्वाची मुद्द्यांवर निर्णय घेतला जाईल. यासह फ्रेंचायझी बीसीसीआयसमोर विदेशी खेळाडूंचा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे. जे खेळाडू ऑक्शनमध्ये भाग घेतात, त्यांना फ्रेंचायझी मोठी रक्कम मोजून घेतात. पण स्पर्धेपूर्वी नाव मागे घेतल्याने सर्वच चित्र बिघडतं.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, फ्रेंचायझी मालकांनी या संदर्भात बीसीसीआयला कठोर पावलं उचलण्यास सांगितलं आहे. तसेच नियम करण्याची मागणी केली आहे. यामुळे ऑक्शन झाल्यानंतर खेळाडू नाव मागे घेणार नाहीत. तसेच संघाचा समतोल बिघडणार नाही. इतकंच काय तर काही फ्रेंचायझी मालकांनी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता बीसीसीआयने या मागणीवर शिक्कामोर्तब केलं तर काही खेळाडूंवर बंदी येऊ शकते. बीसीसीआयने हा मुद्दा अजेंडात घेतल्याने नक्कीच या संदर्भात काही ना काही निकाल समोर येईल.
आयपीएलच्या 17 वर्षांच्या कार्यकाळात अनेक विदेशी खेळाडूंनी ऐनवेळी आपलं नाव मागे घेतलं आहे. काही जणांनी कौटुंबिक कारण पुढे करत स्पर्धा मध्यातच सोडली आहे. काही खेळाडू ऑक्शननंतर वर्कलोड आणि मानसिक थकव्याचं कारण देत नावे मागे घेतात. इंग्लंडचा जेसन रॉय, एलेक्स हेल्स आणि ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनने कमीत कमी दोन ते तीन वेळा असं केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने जर फ्रेंचायझींचं म्हणणं ऐकलं तर या खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी लागू शकते.