IPL Media Rights Auction: एकच प्लॅटफॉर्म नाही, वेगवेगळ्या चॅनल्सवर दिसणार IPL सामने, जाणून घ्या लिलावाचं संपूर्ण गणित
IPL Media Rights Auction: IPL मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव मुंबईमध्ये सुरु आहे. चार पॅकेजपैकी दोन पॅकेजचा लिलाव झाला आहे. बीसीसीआयकडून 2023 ते 2027 पर्यंतच्या मीडिया राइट्सची विक्री सुरु आहे.
मुंबई: IPL मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव मुंबईमध्ये सुरु आहे. चार पॅकेजपैकी दोन पॅकेजचा लिलाव झाला आहे. बीसीसीआयकडून 2023 ते 2027 पर्यंतच्या मीडिया राइट्सची विक्री सुरु आहे. लिलावात अधिकार विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात आहे. आतापर्यंत टीवी राइट्स आणि डिजिटल राइट्ससाठीचा लिलाव झाला आहे. या दोन राइट्सच्या विक्रीतून BCCI ला एका सामन्यासाठी 107 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. टीवी राइट्स प्रतिसामना 57.5 कोटी रुपयात आणि डिजिटल राइट्सची (Digital Rights) प्रति सामना 50 कोटी रुपयात विक्री झाली आहे. पॅकेज ए आणि बी अशा दोन कॅटेगरीसाठी लिलाव झाला आहे. या दोन कॅटगरीची मिळून एकूण रक्कम 42,255 कोटी रुपये होते. पॅकेज ए ची किंमत 23,575 कोटी रुपये तर पॅकेज बी ची एकूण किंमत 21,680 कोटी रुपये आहे. लिलाव अजूनही बाकी आहे. प्लेऑफ मॅचचे राइट्स आणि भारतीय उपखंडाबाहेरील ब्रॉडकास्ट राइट्सची विक्री होणं बाकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएलचे टीवी राइट्स एका कंपनीकडे आणि डिजिटल राइट्स दुसऱ्या कंपनीकडे आहेत.
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसणार सामने
टीवी राइट्स आणि डिजिटल राइट्सची वेगवेगळी विक्री झाली आहे. या बद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर असं असेल, तर पुढची पाच वर्ष आयपीएल सामने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतील. आतापर्यंत स्टार स्पोर्ट्सवर सामन्यांचे प्रसारण व्हायचे. याच चॅनलचं ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीमिंग व्हायचं. पण यापुढे असं होणार नाही. पण एक वेगळा नियम सुद्धा आहे. पॅकेज ए जिंकणाऱ्या कंपनीला पॅकेज बी साठी बोली लावण्याचा अधिकार आहे. पॅकेज बी ने लावलेल्या किंमतीपेक्षा एक कोटी रुपये अधिकचे मोजून ऑनलाइन स्ट्रीमिंगचे अधिकार मिळवण्यासाठी बोली लावावी लागेल.
पॅकेज ए कडे पॅकेज सी चा ऑप्शन
पॅकेज ए जिंकणाऱ्या कंपनीकडे पॅकेज सी साठी बोली लावण्याचा अधिकार असेल. कारण यात प्लेऑफच्या सामन्यांचा समावेश आहे. पॅकेज सी आणि डी च्या लिलावाचा निकाल अजून आलेला नाही. त्याशिवाय लिलावात बाजी मारणाऱ्या कंपन्यांची नावही समजायची आहेत.