रोहित शर्मासोबत हे दोन दिग्गज खेळाडू ही सोडणार मुंबई इंडियन्सचा संघ?
रोहित शर्मा याला मुंबई संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी आहे. पण काही खेळाडू देखील नाराज आहेत. मुंबईला सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माची ओळख आहे. पण त्याला असे तडकाफडकी हटवल्याने काही खेळाडू नाराज असल्याचं बोललं जात आहे.
IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीपासूनच मुंबई इंडियन्स चर्चेचा विषय बनला आहे. कारण मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते नाराज आहेत. हार्दिकला नवा कर्णधार बनवणं हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडलेला दिसत नाहीये. मुंबईचे चाहते मैदानावर देखील त्याचा विरोध करताना दिसत आहेत. त्यानंतर रोहितच्या निर्णयांचा संघात आदर केला जात नसल्याच्या बातम्या देखील पुढे येत आहे. रोहित शर्मा देखील हार्दिक पांड्याच्या निर्णयावर खूश नाहीये, त्यामुळे आयपीएल 2024 नंतर तो मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या अफवांना वेग आला आहे. आता रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचीही नावे पुढे आली आहेत. हा सीझन संपल्यानंतर हे दोघेही एमआय फ्रँचायझी सोडू शकतात.
कोणते खेळाडू एमआय सोडू शकतात
आता अशा ही बातम्या येत आहेत की, रोहित शर्मा सोबत जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव देखील संघ सोडणार आहेत. आयपीएल 2024 नंतर ते मुंबई इंडियन्सला सोडून दुसऱ्या संघात जाऊ शकतात. रोहित शर्मा गेल्या 14 वर्षांपासून आयपीएल खेळतो आहे. सूर्यकुमार यादव देखील 9 वर्ष आणि जसप्रीत बुमराह 12 वर्षापासून आयपीएल खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. हार्दिक पांड्या आणि टीम मॅनेजमेंटमधील मतभेदांमुळे रोहित शर्मा फ्रँचायझी सोडण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहितकडे सोपवले जाऊ शकते, अशा बातम्याही आल्या आहेत, परंतु ड्रेसिंग रूममधील बदलते वातावरण पाहता रोहितने आधीच आपला निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
रोहितची आयपीएल कारकिर्द
रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत 201 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 5,110 धावा केल्या आहेत. एमआयसाठी त्याने 1 शतक आणि 34 अर्धशतकांची खेळीही खेळली आहे. या सीजनमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत 3 सामन्यात 69 धावा केल्या आहेत, त्यापैकी त्याची सर्वोच्च धावसंख्या 43 आहे.
रोहित शर्मा याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर चाहत्यांनी याला विरोध केला होता. चाहत्यांचा हा विरोध मैदानावर देखील दिसू लागला आहे. कारण मैदानावरच लोकं हार्दिकच्या विरोधात घोषणा देताना दिसले. रोहित शर्माचे चाहते देखील या निर्णयामुळे नाराज आहेत. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या निर्णय़ामुळे इतर खेळाडू देखील नाराज असल्याची चर्चा आहे.