Shahrukh Khan on Andre Russell: आंद्रे रसेल नामक वादळावर शाहरुख खान खूश, म्हणाला, ‘बऱ्याच दिवसांनी…’
Shahrukh Khan on Andre Russell: काल रात्री वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्सवर (KKR vs PBKS) शानदार विजयाची नोंद केली.
मुंबई: काल रात्री वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्सवर (KKR vs PBKS) शानदार विजयाची नोंद केली. आंद्रे रसेल (Andre Russell) नामक वादळाने काही षटकांच्या खेळामध्ये पंजाब किंग्सचा पालापाचोळा करुन टाकला. आंद्रे रसेलचा पावर हिटिंगचा खेळ पाहून जणू शक्तीमानच त्याच्यात संचारल्याचा भास झाला. मैदानावर त्याने राज्य केलं. चौफेर फटकेबाजी करुन क्रिकेट रसिकांच भरपूर मनोरंजन केलं. त्याच्यासारख्या फलंदाजांमुळे टी-20 क्रिकेट रंगतदार बनतं. काल त्याची प्रचिती आली. पंजाब किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 138 धावांच लक्ष्य दिलं होतं. चार बाद 51 अशी केकेआरची स्थिती असताना तो फलंदाजीसाठी मैदानात आला. सात ते आठ षटकांच्या खेळात त्याने सामनाच संपवून टाकला.
PBKS चे गोलंदाज हतबल
पंजाब किंग्सची गोलंदाजी रसेलसमोर निष्प्रभ ठरली. पंजाब किंग्सच्या पहिल्या सामन्यात ओडियन स्मिथने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला होता. काल त्याच स्मिथच्या गोलंदाजीचा आंद्रे रसेलने कचरा केला. त्याच्या एका ओव्हरमध्ये 29 धावा वसूल केल्या. कोलकाताने पंजाब किंग्स विरुद्धचा हा सामना सहा विकेट राखून जिंकला. संघ अडचणीत असताना रसेलने ही खेळी केली. त्याने 31 चेंडूत नाबाद 70 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि आठ षटकार होते.
‘माझ्या मित्रा तुझं…’
आंद्रे रसेलच्या या फलंदाजीवर कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान खूश झाला आहे. संघाने मिळवलेल्या या शानदार विजयाबद्दल त्याने आंद्रे रसेल, उमेश यादवसह संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “आंद्रे रसेल माझ्या मित्रा तुझं स्वागत आहे. बऱ्याचदिवसांनी चेंडूला हवेत इतक्या उंच उडताना बघितलं. उमेश तू सुद्धा चांगला खेळलास. श्रेयससह संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा. शुभ रात्री” असं शाहरुखने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Welcome back my friend @Russell12A so long since saw the ball fly so high!!! It takes a life of its own when U hit it Man! And @y_umesh wow! To @ShreyasIyer15 & team well done.Have a happy nite boys.
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 1, 2022
ऑरेंज-पर्पल कॅप KKR कडे
कोलकाताकडून उमेश यादवने भेदक मारा केला. त्यामुळे एकवेळ पंजाबची स्थिती आठ बाद 102 होती. कागिसो रबाडाच्या 25 धावांमुळे पंजाबची धावसंख्या 137 पर्यंत पोहोचली. उमेश यादवने चार षटकात 23 धावा देत चार विकेट घेतल्या. सलग तिसऱ्या सामन्यात त्याने पहिल्या ओव्हरमध्ये पहिली विकेट काढली. पर्पल कॅप उमेश यादवकडे असून त्याने आतापर्यंत आठ विकेट काढल्या आहेत. 70 धावा करणाऱ्या आंद्रे रसेलकडे ऑरेंज कॅप आहे.