‘बॅट मला मारु नकोस…’, विराट कोहलीने इशान किशनला काय सांगितलं?
'मी डबल सेंच्युरीपासून 3 रन्स दूर होतो, त्यावेळी...'
मुंबई: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीज गमावली. पण शेवटचा सामना टीम इंडियाने 227 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. इशान किशनची डबल सेंच्युरी या सामन्याचं वैशिष्ट्य ठरली. इशान किशनने या सामन्यात बांग्लादेश विरुद्ध 131 चेंडूत 210 धावा फटकावल्या. तो क्रिकेट विश्वातील वेगवान डबल सेंच्युरी झळकवणारा पहिला फलंदाज ठरला. या आपल्या तुफानी इनिंगनंतर इशान किशनने एक इंटरेस्टिंग खुलासा केला. विराट कोहलीने आपल्याला मोठे शॉट्स खेळण्यापासून रोखलं. त्यामुळे मी डबल सेंच्युरीपर्यंत पोहोचू शकलो, असं इशानने सांगितलं.
मी विराट भाईला सांगितलं होतं, की….
इशान किशनने सोनी लिववर बोलताना सांगितलं की, “मी डबल सेंच्युरीपासून 3 रन्स दूर होतो, त्यावेळी मी मोठे शॉट्स खेळू नये, यासाठी विराट कोहलीला आठवण करुन द्यायला सांगितलं होतं” “मी 197 रन्सवर होतो. त्यावेळी मुस्तिफिजुर मला स्लोअर चेंडू टाकेल असं वाटत होतं. सीरीजमध्ये मला एक संधी मिळाली होती. ती संधी मला वाया घालवायची नव्हती. म्हणून मी विराट भाईला सतत मला सिंगल काढण्याची आठवण करुन द्यायला सांगितलं होत” असं इशान म्हणाला.
आनंदाच्या भरात काय घडलं असतं?
विराट कोहली सतत मला सिंगल रन्स घेण्याची आठवण करुन देत होता. डबल सेंच्युरीच्या आनंदात कोण कुठे आहे, हे मी पाहिलं नाही. विराट कोहली मागेच होता. माझी बॅट त्याला लागली असती, त्यामुळे बॅट मला मारु नकोस, असं विराटने मला सांगितलं. इशान किशनने या सामन्यात कमालीची बॅटिंग केली. त्याने बांग्लादेशी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने आपल्या डबल सेंच्युरीमध्ये 24 चौकार आणि 10 षटकार लगावले.
विराट कोहलीने ठोकलं शतक
विराट कोहलीने या मॅचमध्ये शानदार शतक ठोकलं. विराट 113 धावांची इनिंग खेळला. तीन वर्षानंतर त्याने शतक झळकावलं. विराट आणि इशान दरम्यान दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी झाली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 409 धावांचा डोंगर उभारला. बांग्लादेशची टीम 34 ओव्हर्समध्ये 182 रन्सवर ऑलआऊट झाली.