IND vs WI | एक जागा, कोणाला निवडायच? वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित-द्रविड जोडीसमोर सर्वात मोठा प्रश्न
IND vs WI | टीम इंडियाला आपली नवीन टेस्ट टीम तयार करण्याची संधी आहे. सिलेक्टर्सनी काही युवा खेळाडूंना संधी दिली आहे. पण म्हणून टीम मॅनेजमेंट समोरचे प्रश्न सुटलेले नाहीत.
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. सध्या दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजची तयारी सुरु आहे. या सीरीजपासून टीम इंडिया तिसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अभियानाची सुरुवात करेल. भारतासाठी ही सीरीज खूप महत्वाची आहे. कारण या सीरीजपासून टीम इंडियाला आपली नवीन टेस्ट टीम तयार करण्याची संधी आहे. सिलेक्टर्सनी काही युवा खेळाडूंना संधी दिली आहे. पण म्हणून टीम मॅनेजमेंट समोरचे प्रश्न सुटलेले नाहीत.
या दौऱ्यासाठी सिलेक्टर्सनी दोन विकेटकीपरची निवड केलीय. एक केएस भरत आणि दुसरा इशान किशन. टीम मॅनेजमेंटला या दोघांपैकी कोणा एकाची निवड करावी लागेल. हा निर्णय घेण्याआधी हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्माच्या डोक्यात एक गोष्ट नक्की असेल, की त्यांना ऋषभ पंतला पर्याय तयार करायचा आहे. या सीरीजपासून टीम मॅनेजमेंटकडे याकडे विशेष लक्ष देईल.
टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब
पंतचा मागच्यावर्षी 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. त्याची कमतरता टीम इंडियाला जाणवतेय. खासकरुन टेस्ट मॅचमध्ये. पंतने टेस्टमध्ये शानदार खेळ दाखवला आहे. त्याने अनेकदा टीमला पराभवाच्या संकटातून बाहेर काढलय. पण पंतच्या जागी त्याच्यासारखा फलंदाज-विकेटकीपर मिळालेला नाही. टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे. आता पंतचा पर्याय तयार करण्यावर लक्ष असेल.
अशा प्लेयरची गरज
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऋषभ पंतची कमतरता जाणवली. पंतने टेस्टमध्ये विकेटकिपिंगचे नवीन मापदंड तयार केलेत. टीम इंडियाला आता यष्टीपाठी वेगाने हालचाल करणाऱ्या आणि बॅट हातात घेतल्यानंतर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. पंतने हे काम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही ठिकाणी केलय.
कोणाला मिळणार संधी?
टीम इंडियाला पंत सारख्या विकेटकीपर-फलंदाजाची आवश्यकता आहे. टीमने टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केएस भरतला संधी दिली. भरत विकेटकीपिंगमध्ये चांगला आहे, पण त्याच्या बॅटिंगमध्ये दम नाहीय. टीम इंडियाकडे इशान किशनच्या रुपात पर्याय आहे. पंत इशान किशनसारखाच आक्रमक आहे. वेगवान स्फोटक बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. पंतप्रमाणे इशान किशनलाही गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला आवडतं. भविष्याचा विचार करुन निर्णय झाल्यास इशान किशन टेस्ट डेब्यु करु शकतो. ऋषभ पंतच्या जागी त्याला बऱ्याच संधी सध्या मिळू शकतात. त्यामुळे विडिंज दौऱ्यात इशान किशनला संधी मिळाल्यास, आश्चर्य वाटून घेऊ नका.