इशान किशनची प्लेइंग 11 मध्ये अचानक एन्ट्री, नेमकं काय घडलं?
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरु आहेत. इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आणि इंडिया बी विरुद्ध इंडिया सी यांच्यात लढत होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी संघ घोषित केल्यानंतर दुलीप ट्रॉफीतील संघावर प्रभाव पडला आहे. पण असं असताना इशान किशनची अचानक झालेली एन्ट्री पाहून क्रीडाप्रेमी आवाक् झाले आहेत.
देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं महत्त्व खूपच वाढलं आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांचा चेहरामोहराच बदलला आहे. दिग्गज खेळाडू खेळत असल्याने सामन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. या स्पर्धेसाठी इशान किशन, संजू सॅमसन आणि रिंकु सिंह यांची निवड झाली नव्हती. पण पहिल्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढल्याने संजू सॅमसनला इंडिया डी संघात स्थान मिळालं. तर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघाची निवड झाल्यानंतर रिंकु सिंहचा विचार केला गेला. रिंकु सिंहला इंडिया बी संघात स्थान मिळालं. पण या दरम्यान इशान किशनच्या नावाची कुठेच चर्चा नव्हती. पण अचानक तो इंडिया सी संघाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला. त्यामुळे इशान किशन प्लेइंग इलेव्हनमध्ये अचानक प्रकटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण बांग्लादेश कसोटीसाठी संघ घोषित केल्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील संघात उलथापालथ झाली. या संघातील बदली खेळाडूंची घोषणा करण्यात आली. पण यात इशान किशनचं नाव कुठेही नव्हतं.
प्लेइंग इलेव्हनमध्ये आयर्न जुयालच्या जागी इशान किशनला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, शौकीनच्या जागी मयंक मार्कंडेय आणि हिमांशुच्या जागी संदीप वॉरियरला संधी मिळाली आहे. इशान किशनने पहिल्याच सामन्यात आपली चमक दाखवली. 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे इशान किशन जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. इशान किशनची वर्णी कसोटी संघात लागली नसली तर त्याचा विचार बांगलादेशविरुद्धच्या टी20 संघासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याला आपाला फॉर्म कायम राखणं गरजेचं आहे.
इंडिया सी संघाची प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), इशान किशन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, बाबा इंद्रजीत, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मानव सुथार, अंशुल कंबोज, मयंक मार्कंडे, विजयकुमार विशक, संदीप वॉरियर.
इशान किशनला टीम इंडियात स्थान मिळणं गेल्या काही दिवसात कठीण झालं आहे. बीसीसीआयने त्याला सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधूनही बाहेर केलं आहे. त्यामुळे इशान देशांतर्गत क्रिकटमधून टीम इंडियात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इशानने बुची बाबू स्पर्धेतून सुरुवात केली आणि पहिल्या सामन्यात शतक ठोकलं. पण दुखापतग्रस्त झाल्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मुकला होता.