ISSF World Cup: कोल्हापूरच्या शाहू मानेचा सुवर्ण वेध, नेमबाजीच्या वर्ल्ड कप मध्ये गोल्ड मेडल
ISSF World Cup: कोल्हापूरच्या शाहू मानेने (Shahu Tushar Mane) विश्वचषक नेमबाजी (ISSF World Cup) स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
मुंबई: कोल्हापूरच्या शाहू मानेने (Shahu Tushar Mane) विश्वचषक नेमबाजी (ISSF World Cup) स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने मेहुली घोषच्या (Mehuli Ghosh) साथीने 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. शाहू-मेहुलीने हंगेरीच्या ईस्तवान पेन आणि ईस्तर मेसझारोस जोडीवर 17-13 असा विजय मिळवला. पात्रात फेरीतच शाहू-मेहुली जोडीने सर्वाधिक 634.3 गुण मिळवत प्रथम स्थान पटकावलं. ईस्तवान पेन-ईस्तर मेसझारोस जोडीने चांगली सुरुवात केली होती. पण शाहू-मेहुलीने स्पर्धेतील अनुभवाच्या बळावर तोडीस तोड खेळ करत, सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. जागतिक नेमबाजी स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. दक्षिण कोरिया चांगवान येथे ही विश्वचषक नेहमाबी स्पर्धा सुरु आहे. पुरुषांच्या ट्रॅप टीमने रौप्यपदक पटकावलं. शिवा नरवाल आणि पलक जोडीने 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कास्यपदक पटकावलं. त्यांनी कझाकस्तानच्या जोडीवर 16-0 असा विजय मिळवला.
सुमा शिरुर शाहूच्या प्रशिक्षक
भारताच्या अव्वल नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू माने नेमबाजीचे धडे गिरवतो. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिष्याने आपल्या गुरुला सुवर्णपदकाची भेट दिली. शाहू माने हा केआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिक शाखेत दुसऱ्या वर्गात शिकत आहे.
पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य अशी एकूण चार पदाकांची कमाई भारताने केली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बाबुताने तिसऱ्या दिवशी पहिलं सुवर्णपदक मिळवलं होतं.