मला कोणाच्या दबावाखाली राहायचं नाही, बुमराहसोबतच्या वादानंतर मार्को यान्सिनची प्रतिक्रिया
जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर असताना मैदानावर खेळाडूंमध्ये तणावही वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या.
डरबन : जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर असताना मैदानावर खेळाडूंमध्ये तणावही वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या. डरबन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या रेसी वान डर डुसें यांच्यामधली शाब्दिक बाचाबाची मायक्रोफोनमुळे समजली. पंत आणि डुसें प्रमाणेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मार्को यान्सिनमध्येही (Marco Jansen) मैदानावर वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
दोघेही शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून दोघे एकत्र खेळलेही आहेत. तरीसुद्धा मैदानावर बुमराह आणि यान्सिनमध्ये शाब्दिक वादावादी झाली. यान्सिन त्याचा अवघा दुसरा कसोटी सामना खेळतोय. पण त्याने आपल्या गोलंदाजीने भारताला दणके दिले. बाऊन्सर चेंडूंवरुन बुमराह आणि यान्सिनमध्ये वाद झाला. 54 व्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज यान्सिनने बुमराहवर बाऊन्सर चेंडूंचा मारा केला. यान्सिनचा तिसरा चेंडू बुमराहच्या खांद्याला लागला. त्यानंतर यान्सिनने चौथा चेंडूही बाऊंन्सरच टाकला. पण बुमराहने स्वत:ला वाचवलं. त्यानंतर यान्सिनने बुमराहला ठसन दिली व दोघांमध्ये काही बोलणे झाले.
यान्सिन रनअप घेण्यासाठी जात असताना, बुमराह पुढे येऊन काहीतरी बोलला. यान्सिन आणि बुमराह परस्परांच्या खूपच जवळ आले. दोघांची देहबोली आक्रमक होती. त्यावेळी वातावरण शांत करण्यासाठी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. पंचांनी बुमराहला शांत राहण्यास सांगितले. यान्सिनच्या षटकानंतर रबाडाने सुद्धा बुमराहला बाऊन्सर गोलंदाजी केली. पण बुमराहने शानदार षटकार मारला. त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये उपस्थित संघाने टाळ्या वाजवून बुमराहचे कौतुक केले.
दरम्यान, या वादावर आता मार्को यान्सिनने प्रतिक्रिया दिली आहे. या 21 वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिका क्रिकेट (CSA) च्या ट्विटर हँडलवरून माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘मी आयपीएलमध्ये बुमराहसोबत खेळलो आहे आणि आम्ही चांगले मित्र आहोत. जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता, तेव्हा तुम्हाला इतरांनी दडपू नये असे वाटते. कधी कधी भावना मैदानात दिसतात.
आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट भावना नाही : मार्को
यान्सिन म्हणाला, “त्यानेदेखील (बुमराह) तशीच प्रतिक्रिया दिली आणि कोणाच्या मनात वाईट भावना नाही,” तिथले वातावरण असेच होते. देशासाठी सर्वस्व पणाला लावणार्या दोन खेळाडूंमध्ये हे घडले. यान्सिन म्हणाला की, त्याच्याकडे अंतर्मुखी व्यक्तिमत्त्व आहे. तो म्हणाला, ‘मी मैदानाबाहेर थोडा अंतर्मुख आहे. पण मला सर्वात जास्त आवडणाऱ्या खेळाच्या मैदानावर व्यक्त व्हायचं आहे. मला खेळाची आवड आणि जोष दाखवायचा आहे.
कसोटी मालिकेत यश मिळवूनही यान्सिन आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाला हलक्यात घेत नाही. तो म्हणाला, “आम्ही कसोटी मालिकेतील कामगिरी पुढे नेण्यासाठी उत्सुक आहोत. पण आम्ही भारताला अजिबात कमी लेखत नाही आहोत. आम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करायला आवडेल.” भारतीय संघ 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 5-1 ने जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
इतर बातम्या
Rahul Dravid: राहुल द्रविड कोच झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या? जसप्रीत बुमराह म्हणाला…
IPL 2022 ला आणखी एक झटका, इंग्लंडच्या एक मोठ्या ऑलराऊंडर प्लेयरने घेतली माघार
(Jasprit Bumrah and Me are friends, says Marco Jansen on heated moments with Indian pacer in IND vs SA test)