जसप्रीत बुमराह, हर्षल पटेलच्या बाबतीत टीम इंडियासाठी एक Good News
दुखापतीमुळे त्यांचा आशिया कप साठी निवडण्यात आलेल्या संघात समावेश केलेला नाही. वर्ल्ड कप मध्ये त्यांच्या खेळण्याबद्दलही साशंकता आहे.
मुंबई: टीम इंडियासाठी (Team India) एक चांगली बातमी आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेलने (Harshal patel) आता मैदानात उतरुन कसरती आणि सराव सुरु केला आहे. दोघे सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलटेशन कार्यक्रमामध्ये आहेत. दुखापतग्रस्त असल्याने दोघे एनसीए मध्ये आहेत. मैदानात सुरु केलेल्या कसरती, हे दोघे दुखापतीमधून सावरत असल्याचं लक्षण आहे. ऑस्ट्रेलियात होणारी आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलला भारतीय संघाची पहिली पसंती आहे. दुखापतीमुळे त्यांचा आशिया कप साठी निवडण्यात आलेल्या संघात समावेश केलेला नाही. वर्ल्ड कप मध्ये त्यांच्या खेळण्याबद्दलही साशंकता आहे. एनसीए मध्ये दोघांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरु आहे.
त्याच्याबाजूने सर्व प्रयत्न करतोय
इंग्लंड दौऱ्यापासून जसप्रीत बुमराह भारतीय संघाबाहेर आहे. त्याला पाठिची दुखापत झालीय. याच दुखापतीमुळे तो आशिया कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीय. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये सामना होणार आहे. जसप्रीत बुमराहचं वर्ल्ड कप टीम मध्ये नसणं, निश्चित भारतासाठी एक झटका असेल. पण त्याआधी बुमराह फिट होण्यासाठी त्याच्याबाजूने सर्व प्रयत्न करतोय.
बुमराह मैदानात काय करतोय?
बुमराहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केलाय. त्यात तो फिटनेस परक मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कसरती करताना दिसतोय. धावणं, अडथळ्यांवरुन उड्या मारणं, व्हिडिओ मध्ये बुमराह अशा कसरती करताना दिसतो.
View this post on Instagram
बुमराह-पटेलकडे तीन आठवडे
दुसरीकडे हर्षल पटेलच्या रिकव्हरी मध्ये सुद्धा प्रगती दिसून आलीय. एनसीए मध्ये हर्षलने सुद्धा फिल्डवर उतरुन कसरती सुरु केल्या आहेत. दोघांनी नेट्स मध्ये अजून सराव सुरु केलेला नाही. नेटमधील त्यांच्या ट्रेनिंगवर निवड समितीचं बारीक लक्ष असेल. आगामी वर्ल्ड कपसाठी निवड समिती 15 सप्टेंबरला संघ जाहीर करणार आहे. फिटनेस परत मिळवण्यासाठी बुमराह आणि हर्षलकडे तीन आठवड्यांचा कालावधी आहे.