Joe Root ने केली सात संघांची शिकार, धावांच्या राशी उभारल्या, विराट कोहली-स्टीव स्मिथ आसपासही नाही
इंग्लंडच्या क्रिकेट संघाने टेस्ट फॉर्मेटमध्ये (Test Format) अनेक बदल केले आहेत. कॅप्टन बदलला असून नवीन कोच आला आहे. टीम मध्ये नव्या खेळाडूंना संधी दिलीय. हे सर्व बदल झाले असले, तरी एक गोष्ट बदललेली नाही.
मुंबई: इंग्लंडच्या क्रिकेट संघाने टेस्ट फॉर्मेटमध्ये (Test Format) अनेक बदल केले आहेत. कॅप्टन बदलला असून नवीन कोच आला आहे. टीम मध्ये नव्या खेळाडूंना संधी दिलीय. हे सर्व बदल झाले असले, तरी एक गोष्ट बदललेली नाही, ती म्हणजे जो रुटचा (Joe Root) फॉर्म. इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मागचा दीड-दोन वर्षांपासून सुरु असलेला शानदार फॉर्म कायम आहे. न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीत (Lords Test) त्याने अशीच खेळी केली. जे त्याच्या पीढीचे अन्य दिग्गज फलंदाज करु शकले नाहीत. जागतिक क्रिकेटमधील सर्वच मोठ्या संघांविरोधात धावा करणाऱ्या जो रुटने न्यूझीलंडविरुद्ध एक खास टप्पा गाठला आहे. लॉर्ड्स कसोटीत त्याने फक्त शतकच झळकावलं नाही, तर 10 हजार धावा सुद्धा पूर्ण केल्या. याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध त्याने 1 हजार धावाही पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये रुटच्या सात संघांविरुद्ध एक हजारपेक्षा जास्त धावा झाल्या आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक धावा
रुटने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. त्याने 24 सामन्यात भारताविरुद्ध सर्वाधिक 2353 धावा केल्या आहेत. फक्त बांगलादेश आणि आयर्लंड विरुद्ध त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही. या दोन संघांविरुद्ध तो फक्त 3 सामने खेळला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली
रुटसोबत स्टीव स्मिथ, विराट कोहली आणि केन विलियमसन या फलंदाजांची सध्याच्या घडीच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होते. पण यापैकी एकही जण रुटच्या आस-पास नाहीय. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
स्मिथ-विलियमसन खूपच मागे
स्टीव स्मिथ आणि केन विलियमसन बद्दल बोलायचं झाल्यास, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे हे दिग्गज अजून खूप मागे आहेत. स्मिथने फक्त भारत आणि इंग्लंड विरुद्ध हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विलियमसनला फक्त पाकिस्तान विरुद्ध हे यश मिळालं आहे.