जो रुटच्या टीमने एकाच दिवशी विजय आणि पराभव पाहिला, पण विजयाचा आनंद कमी, पराभव जिव्हारी लागला!
तुम्ही कोणत्याही संघाला एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच वेळेला हरताना आणि जिंकताना पाहिले आहे का? पाहिलं नसेल ना... पण, इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या टीमसोबत हे घडलं आहे. एकाच दिवसात जो रुटचा संघही हरला आणि नंतर जिंकलाही...!
India vs England : तुम्ही कोणत्याही संघाला एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच वेळेला हरताना आणि जिंकताना पाहिले आहे का? पाहिलं नसेल ना… पण, इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या टीमसोबत हे घडलं आहे. एकाच दिवसात जो रुटचा संघही हरला आणि नंतर जिंकलाही….! आता तुम्ही विचार करत असाल, हे कसं घडलं? असा विचार करणंही रास्तच आहे म्हणा…. वास्तविक, घडलं असं की जो संघ हरला तो जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघ होता. आणि, विजयाचा आस्वाद घेणारा संघ होता जो रुटचा काउंटी संघ म्हणजेच यॉर्कशायर…..!
दिवसही एक होता. वेळ देखील जवळजवळ तीच होती आणि जागा होती इंग्लंडची माती. इंग्लंडचा संघ जेव्हा ओव्हल मैदानावर कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारताकडून हरला तेव्हा यॉर्कशायर विजयाचा आस्वाद घेण्यात मग्न होता. जेव्हा दोन्ही सामन्यांचे अंतिम निकाल आला तेव्हा भारताने इंग्लंडचा 157 धावांनी दणदणीत पराभव केला होता आणि कौंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायरने प्रतिस्पर्ध्यांवर एक डाव आणि 33 धावांनी विजय मिळविला होता.
ओव्हलमध्ये भारताने साहेबांना पाणी पाजलं
ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाने 50 वर्षांनंतर ओव्हलच्या किल्ल्यावर भारताने तिरंगा फडकावला. भारताने 5 कसोटींच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. म्हणजेच आता इंग्लंड दौऱ्यावर गेलेली विराटसेना कसोटी मालिका गमावून माघारी फिरणार नाही, एकतर साहेबांना आस्मान दाखवून परत येईल नाहीतर हम भी किसीसे कम नहीं म्हणत मालिकेत बरोबर करेल…..!
काऊंटीमध्ये जो रुटच्या टीमचा विजय
दुसरीकडे, यॉर्कशायरचा संघ काऊंटी क्रिकेटच्या डिव्हिजन 1 च्या सामन्यात समरसेटला पराभूत करून ग्रुपमध्ये अव्वल आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना समरसेटचा पहिला डाव अवघ्या 134 धावांवर ऑलआऊट झाला. यॉर्कशायरने पहिल्या डावात 308 धावा केल्या. समरसेटच्या संघाला दुसऱ्या डावातही विशेष कामगिरी करता आली नाही. फक्त 141 धावांवर दुसरा डावही गडगडला. यॉर्कशायरने ही मॅच अगदी सहज जिंकली. यॉर्कशायरचा 23 वर्षीय वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशरने दोन्ही डावांमध्ये समरसेटला मोठे धक्के दिले. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या फिशरने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 4 बळी मिळवत आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
भारताची मालिकेत आघाडी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये इतिहास रचला. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंड संघाचा (England Cricket Team) 157 धावांनी धुव्वा उडवून तब्बल 50 वर्षानंतर ओव्हलचा गड सर केलाय. भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयासोबत भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा :