T20 World Cup मधून बाहेर झालेल्या भारतीय खेळाडूंवर कपिल देव यांचा गंभीर आरोप, BCCI ला हस्तक्षेप करण्याचे आवाहन
देश मोठा की आयपीएल? या प्रश्नाने भारतीय क्रिकेटमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.
मुंबई : देश मोठा की आयपीएल? या प्रश्नाने भारतीय क्रिकेटमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला आहे. यासोबतच बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहनही देव यांनी केले आहे. सध्याचा टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी चांगला गेला नाही. या स्पर्धेतील संघाचे पदार्पण इतके खराब झाले की उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडून त्याची किंमत भारताला चुकवावी लागली. (Kapil Dev Blames Players Prioritising IPL Over Country After Team India’s defeat in T20 World Cup)
कपिल देव यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की, “जे घडले ते विसरून आपण आता पुढील टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, पुढील स्पर्धेच्या आयोजनाला जास्त वेळ नाही. भारताने आता तयारी करून पुढची योजना आखली पाहिजे.” देव म्हणाले की, आपल्या खेळाडूंना एक्स्पोजर मिळत आहे, पण ते त्याचा पुरेपूर वापर करू शकत नाहीत.
काही खेळाडू आयपीएलला अधिक पसंती देत आहेत : कपिल देव
दरम्यान, एक मोठे वक्तव्य देताना भारताचे माजी कर्णधार म्हणाले की, “संघातील काही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देत आहेत. बीसीसीआयने याकडे गांभीर्याने पाहावे. मात्र, खेळाडूंनी फ्रेचायझी क्रिकेट खेळू नये, असे मी म्हणत नाही, असेही कपिल देव म्हणाले. पण खेळाडूंनी स्वतःच त्यांचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे.
कपिल देव म्हणाले, “जेव्हा खेळाडू देशापेक्षा आयपीएलला अधिक प्राधान्य देऊ लागतात, तेव्हा आपण काहीही बोलू शकत नाही. आपल्या देशासाठी खेळताना खेळाडूला अभिमान वाटला पाहिजे. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहित नाही त्यामुळे मला जास्त काही सांगता येणार नाही. पण मी नक्कीच म्हणेन की, आधी देश असावा आणि नंतर फ्रेंचायझी असावी. फ्रेंचायझी क्रिकेट खेळू नका असे मी म्हणत नाही. पण क्रिकेटचे उत्तम नियोजन करण्याची जबाबदारी बीसीसीआयची असली पाहिजे. चालू स्पर्धेत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती न केल्यास आपल्याला मोठा धडा मिळेल. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या मोठ्या पराभवाचा फटका बसून स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
इतर बातम्या
(Kapil Dev Blames Players Prioritising IPL Over Country After Team India’s defeat in T20 World Cup)